लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : एकीकडे काेराेना संक्रमण जाेर करीत असताना दुसरीकडे अवैध दारूविक्रेते आणि वाहतूकदारांनी उचल घेतली आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रायवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २१) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये कारचालक राधेश्याम सुधाकर खुबाळकर याच्यासह अन्य एकाचा समावेश असून, दाेघेही खापा, ता. सावनेर येथील रहिवासी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना या भागातून कारमध्ये दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी रायवाडी येथील बसस्टाॅपजळ एमएच-३१/सीएम-५८२८ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना कारध्ये रबरी ट्यूब व ट्यूबमध्ये माेहफुलाची दारू असल्याचे आढळून आले.
ती माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कारमधील दाेघांना ताब्यात घेत अटक केली आणि त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची कार आणि ४० हजार रुपयांची २०० लिटर माेहफुलाची दारू असा एकूण ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. या प्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार बाबा केचे, हवालदार नीलेश बर्वे, शिपाई राजेंद्र रेवतकर, राेहन डाखाेरे, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.
...
मध्यप्रदेशातून तस्करी
ही माेहफुलाची दारू मध्य प्रदेशातून खापा व परिसरातील गावात विक्रीसाठी आणली जात हाेती. नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमणामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाची सीमा सील करण्यात आली आहे. प्रवाशांना किंवा इतर नागरिकांना मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येण्यासाठी किंवा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी परवानगीसह तपासणी व इतर बाबींना सामाेरे जावे लागते. मात्र, अवैध दारू वाहतूकदार बिनबाेभाटपणे सीमा ओलांडून प्रवास करतात. लाॅकडाऊनच्या काळात याला उधाण आले असून, पाेलीस प्रशासनाची डाेकेदुखी वाढली आहे.