लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या नऊ महिन्यात केलेल्या विशेष तपासणीत ११८ अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणला, तर तपासणी केलेल्या ३८५ स्कूल बसमधून १७८ स्कूलबसमध्ये दोष आढळून आले, यामुळे कशी होणार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील ८० टक्के विद्यार्थी हे स्कूल बस, स्कूल व्हॅन व आॅटोरिक्षामधून प्रवास करतात. म्हणूनच विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली. या नियमानुसार शहरात स्कूल बस व व्हॅनचा वेग ताशी ४० कि.मी. तर ग्रामीण भागात ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असू नये यासाठी प्रत्येक स्कूल बस व स्कूल व्हॅनला ‘स्पीड गव्हर्नर’ची सक्ती करण्यात आली आहे. लहान मुले व विद्यार्थिनींच्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवण्याचा नियम आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनीभागात विद्यार्थ्यांच्या नावाची यादी व पालकांचे संपर्क क्रमांक असलेली यादी लावणे, विद्यार्थ्यांना चढताना-उतरताना व रस्ता ओलंडताना मदतनीसाने मदत करणे, वाहनात शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्था असणे, आपात्कालीन दरवाजा असणे, वाहनाच्या दरवाज्यास चाईल्ड लॉक असणे, प्रथमोपचाराची पेटी असणे, वाहनामध्ये धोक्याचा इशारा देणारे ‘इंडिकेटर्स’ बसविणे, वाहनामध्ये अग्निशमन यंत्र आसन क्षमतेनुसार असणे यासारखे अनेक नियम आहेत. परंतु हे सर्व नियम बहुसंख्य स्कूल बस व व्हॅन चालक पाळत नसल्याचे आरटीओने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.