लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलीस पथकाने नागपूर-जबलपूर महामार्गावर कारवाई करीत जनावरांच्या अवैध वाहतुकीचे स्कार्पिओ वाहन पकडले. त्यात दाेन आराेपींना ताब्यात घेत त्यांची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. या कारवाईत २ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) पहाटे ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कन्हान ठाण्याचे पाेलीस पथक गस्तीवर असताना, नागपूर-जबलपूर महामार्गावर एमएच-०५/एजे-६४६६ क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनावर संशय आल्याने पाेलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. या वाहनात एक गाेऱ्हा व दाेन गाईंना निर्दयतेने काेंबल्याचे आढळून आले. गुरांची अवैध कत्तलखान्यात वाहतूक केली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी आराेपी मुस्ताकित खान रा. कामठी व माे. आसिफ माे. इकबाल अन्सारी रा. नागपूर या दाेघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजार रुपये किमतीची जनावरे व दाेन लाखाचे वाहन असा एकूण २ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मंगेश साेनटक्के यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. दाेन्ही आराेपींना सूचनापत्र देऊन त्यांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कुणाल पारधी, सम्राट वनपर्ती यांनी केली.