केळवद : पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील बिहाडा फाटा परिसरात कारवाई करीत रेड्यांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला. त्यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रेड्यांसह कंटेनर जप्त केला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये रहीस सरीफअहमद (४५, रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश), आशिक उमर माेहम्मद (२०, रा. गुडगाव, हरियाणा), आसिफ माेहम्मद जावेद (३६, रा. सीतामढी, बिहार), माेहम्मद हबीब माेहम्मद बशीर (३२, रा. मधुबनी, बिहार), इखलास फकूर कुरेशी (३४, रा. पलवल, हरियाणा) व निहाल उल्ला माेमताज उल्ला (३५, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) या सहा जणांचा समावेश आहे. केळवद (ता. सावनेर) पाेलीस गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती.
परिणामी, त्यांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील बिहाडा फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यात त्यांनी नागपूरच्या दिशेने जाणारा एचआर-३८/टी-९७७४ क्रमांकाचा कंटेनर थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना ५४ रेडे काेंबले असल्याचे आढळून आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, त्यांनी कंटनेरमधील सहा जणांना ताब्यात घेत अटक केली शिवाय, त्यांच्याकडून ५४ हजार रुपये किमतीच्या रेड्यांसह कंटेनर जप्त केला. त्या कंटेनरची किंमत कळू शकली नाही. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक पंकज वाघाेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.