नागपूर : समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनदृष्ट्या समग्र विकासाचा वेध घेणाऱ्या रायझिंग नागपूर या सचित्र माहिती पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत पार पडले.
विधानभवनाच्या समिती कक्षात हा प्रकाशन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांनी पुस्तकाची मांडणी व प्रकाशनाच्या औचित्याविषयी कौतुक केले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, माहिती संचालक हेमराज बागुल, सह आयुक्त अविनाश कातडे, सहसंचालक राजेंद्र लांडे, आदी उपस्थित होते.
जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे सी-२० परिषद आयोजित होत आहे. या परिषदेसाठी विविध देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित प्रतिनिधींना नागपूर जिल्हा व शहराची ओळख व्हावी या दृष्टीने जिल्ह्याची सचित्र पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
पुस्तकात नेमके काय?
- या पुस्तकात नागपूर जिल्हा व शहराविषयी ओळख यामध्ये इतिहास सामाजिक जीवन व उत्सव वारसा स्थळांची माहिती झिरो माइल नागपूर शहरातील ऐतिहासिक इमारती धार्मिक स्थळे, पुतळा, तलावावरील आकर्षक रंगीत कारंजे, वन पर्यटन, टायगर कॅपिटल, कृषी उद्योग, एज्युकेशन हब यासंदर्भातील माहिती आकर्षक स्वरूपात इंग्रजी भाषेत सचित्र देण्यात आली आहे. या पुस्तकाची निर्मिती नागपूर महानगर विकास प्राधिकरण तर्फे करण्यात आली आहे.