लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात डॉक्टरांवरील हल्ले वाढले आहेत. राज्यात जवळपास ५७ डॉक्टर व रुग्णालयांवर हल्ले झाले तर, देशात २७२ प्रकरणे समोर आली आहेत. डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा आंध्र प्रदेशने नव्वदचा दशकात केला. त्यानंतर २२ राज्यामध्ये असा कायदा अस्तित्वात आला. परंतु गेल्या ११ वर्षांत या कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने १८ जून रोजी देशव्यापी पातळीवर निषेध दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत सर्व खासगी हॉस्पिटल बंद राहतील, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेला आयएमएचे सचिव डॉ. सचिन गाथे, डॉ. अशोक अढाव, डॉ. प्रकाश देव, डॉ. कृष्णा पराते, डॉ. अनिल लद्धड, डॉ. अर्चना कोठारी डॉ. मंजुषा गिरी, डॉ. शहनाज चिमठाणवाला, डॉ. मनीषा राठी, डॉ. आशिष खंडेलवाल आदी उपस्थित होते. डॉ. देवतळे म्हणाले, कोरोना काळात डॉक्टर आपले जीव धोक्यात घालून १२ ते १८ तास रुग्णसेवा देत होते. त्याचवेळी डॉक्टर व रुग्णालयांवर हल्ले होत होते. नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलला आग लावली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये २५ ते ३० रुग्ण भरती होते. यामुळे अशा घटना रोखण्यााठी कठोर कायद्याची गरज आहे. जर असे हल्ले थांबले नाहीत तर हल्ला करणाऱ्यांवर खासगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार नाहीत. यासाठी आयएमए लवकरच पाऊल उचलेल.
वाढत्या हल्ल्यांमुळे रुग्ण रेफरचे प्रमाण वाढले
डॉ. देव म्हणाले, वाढत्या हल्ल्यांमुळे निर्भयपणे रुग्णसेवा देण्यास डॉक्टर घाबरत आहेत. रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचे म्हणजे ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट’ने यासंदर्भातील नुकताच एक अहवाल सादर केला आहे. प्रत्येक डॉक्टर रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठीच प्रयत्न करतो, हे लक्षात घ्यायला हवे.
बाबा रामदेव त्याबाबत अशिक्षितच
डॉ. अढाव म्हणाले, बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी किंवा आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले नाही. ते त्याबाबत अशिक्षितच आहेत. यामुळे त्यांनी अॅलोपॅथीवर केलेल्या टीकेला आम्ही गंभीरतेने घेत नाही. त्यांनी लावलेले आरोप चुकीचे आहेत.
रुग्णालय बिलाशी जुळलेल्या तक्रारी कमीच
डॉ. लद्धड म्हणाले, नागपुरात खासगी हॉस्पिटलने कोरोनाच्या २९ हजार रुग्णांवर उपचार केले. परंतु त्यातुलनेत रुग्णालय बिलाशी जुळलेल्या तक्रारी फार कमी आहेत. त्यातही राजकीय लाभ घेण्यासाठी काही लोकांनी रुग्णालयाविरोधात जाणीवपूर्वक तक्रारी केल्या आहेत.