नागपूर : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आंदोलन उभे करण्याचा पावित्रा घेतला आहे. ८ डिसेंबरला निदर्शने तर ११ डिसेंबरला लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ व ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याची परवानगी दिली आहे. या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत, असा दावा ‘सीसीआयएम’ने केला आहे. ‘आयएमए’ने यावर आक्षेप घेतला आहे. अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, असे आयएमएने स्पष्ट केले आहे.
‘लोकमत’शी बोलताना नागपूर शाखेच्या आएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या, ८ डिसेंबरला शांततामय रीतीने निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधणार आहे. त्यानंतरही अधिसूचना मागे न घेतल्यास ११ डिसेंबरला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक आणि कोरोना सेवा वगळता अन्य वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील.