नागपूर : देशाच्या आर्थिक विकासात आयकर विभागाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर यांच्यावतीने आयोजित भारतीय महसूल सेवेच्या ६८ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर महासंचालक (प्रशिक्षण) गुंजन मिश्रा, अतिरिक्त महासंचालक आर.के. चौधरी, मदनेश मिश्रा, संचालक सुनील उमप, सहायक संचालक लिकायत अली उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या देशात करप्रणाली कार्यक्षमतेने राबविली जाते ते देश झपाट्याने राष्ट्रीय आर्थिक उद्दिष्ट गाठतात. लोकशाहीत कर विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्णपणे कर विभागाने दिलेले कराचे उद्दिष्ट पूर्ण केल्यावर हा निधी केंद्राकडे जातो. केंद्रामार्फतच विविध विकास कामासाठी त्यातून राज्यांना तो निधी मिळतो. देशाच्या व राज्याच्या आर्थिक विकासात कर विभागाचे योगदान मोठे आहे.कार्यक्षम कर विभागामुळेच कर चुकवेगिरीला आळा बसतो. समाजात आर्थिक गुन्हे घडू शकतात. प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी अशी गुन्हेगारी उघड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. आर्थिक गुन्हे रोखण्याचे तसेच कर चुकवेगिरीचे समूळ नष्ट करणे, हे देशापुढील प्रमुख आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रबोधनीतून प्रशिक्षण घेतलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात तडजोड न करता नैतिकमूल्यांची कास धरावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. महासंचालक गुंजन मिश्रा यांनी प्रास्तविक केले तर धनंजय वंजारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
विकासात आयकराचे योगदान महत्त्वाचे
By admin | Published: December 29, 2014 2:38 AM