नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोमवारपासून कडक लॉकडाऊनचा पर्याय निवडला. तर, इंडियन मेडिकल असोसिएशन, (आयएमए) नागपूर शाखेने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गृह विलगीकरण म्हणजे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्ण व काळजी घेणाऱ्या घरातील सदस्यांसाठी मार्गदर्शक सूचना व आचारसंहिता काढली. यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पडणारे प्रश्न, महापालिकेची मदत, कोविड हॉस्पिटलचे फोन नंबर व भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आदींची माहिती दिली आहे. ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांच्या पुढाकारात डॉ. अशोक अढाव, डॉ. प्रकाश देव, डॉ. मिलिंद भृशुंडी व डॉ. रवींद्र सरनाईक यांनी यात सहकार्य केले आहे.
- गृह विलगीकरणाची पात्रता
:: ज्या रुग्णांना डॉक्टरांच्या तपासणीनंतर अतिसौम्य किंवा काहीच लक्षणे नाहीत अशाच रुग्णांना गृह विलगीकरणात राहता येते.
:: घरात स्वतंत्र खोली असल्यास गृह विलगीकरणात राहता येते.
:: एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपण, किमोथेरपी घेत असलेले कॅन्सर रुग्ण आदी गृह विलगीकरणासाठी अपात्र असतात.
:: ६० वर्षांवरील ज्या ज्येष्ठांना इतर आजार असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणात राहावे.
:: गृह विलगीकरणातील रुग्णाची काळजीवाहक याने २४ तास उपलब्ध असावे व रुग्णालयातील तज्ज्ञांशी संपर्कात राहण्याची हमी द्यावी.
- असे असावे गृह विलगीकरण
:: कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र हवेशीर खोली, वेगळे शौचालय व स्वच्छतागृह असावे.
:: घरात ५५ वर्षांवरील व्यक्ती किंवा गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेले रुग्ण असल्यास त्यांना इतरांकडे पाठवावे.
:: आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला हवे.
- गृह विलगीकरणातील रुग्णांनी हे करावे
:: रुग्णाने दररोज २ लिटर पाणी प्यावयास हवे. उकळलेले पाणी थंड करून वापरायला हवे.
:: मास्क लावून राहायला हवे. शिंकताना व खोकलताना तोंडावर रुमाल ठेवायला हवा. वापरलेला रुमाल किंवा मास्क हवाबंद पॉलिथीन थैलीत ठेवावा. वापरलेल्या वस्तू १ टक्का हायपोक्लोराईट द्रावणात २० ते ३० मिनिटे बुडवून ठेवल्यावर धुवून टाकायला हवे.
:: वापरलेले टिश्यू पेपर, मास्क बंद कचरापेटीत टाकावे.
:: शौचास जाण्यापूर्वी ४० ते ६० सेकंद हात साबणाने धुवायला हवे. कापड किंवा वायपिंग किंवा वेस्टटिश्यूपेपर वापरू नये : हात वर करून हवेतच वाळू द्यावे.
:: शौचानंतर जिथे तुम्ही स्पर्श केला तो भाग स्वच्छ करावा. साबणाने हात स्वच्छ धुवावे.
:: कोरोना रुग्णाने स्वत: आपली खोली स्वच्छ करावी. शक्य नसल्यास दुसऱ्यांनी खोली स्वच्छ करताना तीनपदरी मास्क, हातमोजे, फेसशिल्ड व गॉगल्सचा वापर करावा. प्रतिदिवस ३ चमचे ब्लिचिंग पावडर मिसळून दिवसातून दोनदा खोली स्वच्छ करावी.
:: रुग्णाने दुसऱ्यांशी ६ फूट म्हणजे २ मीटर अंतर ठेवावे.
:: भांडी, टॉवेल, चादर वेगळी ठेवावी. वापरल्यानंतर ३० मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवावी.
- स्वत:च्या तब्येतीची अशी राखा निगराणी
:: कोरोना रुग्णाने स्वत:च्या तब्येतीची काळजी स्वत: घ्यावी. जेव्हा ताप आल्यासारखे वाटल्यास थर्मामीटरने मोजायला हवे.
:: दिवसाला दोनदा नाडी ठोके दर पाहायला हवे. हे करताना तर्जनी व मध्यमा बोट मनगटावर ठेवून खालून अंगठ्याने दाबून ठेवा. घड्याळ्यात पाहून १ मिनिटात किती ठोके पडतात, ते नोंद करा.
:: जर ताप १०० अंश फॅरेनाईटपेक्षा अधिक असेल किंवा नाडी दर १०० पेक्षा जास्त असे तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
:: पल्सऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची मात्रा तपासात राहा.
:: रुग्णाकडे थर्मामीटर, पल्सऑक्सिमीटर, डिजिटल ब्लडप्रेशर यंत्र व ग्लुकोमीटर असल्यास अधिक चांगले.
:: रुग्णाने आपला रोज सकाळचा व रात्रीचा पल्स रिपोर्ट, बॉडी टेम्परेचर रिपोर्ट व पल्सऑक्सिमीटरचा रिपोर्ट लिहून ठेवावा.
- वैद्यकीय मदत केव्हा मागाल
:: अशक्तपणा वाटत असल्यास
:: खोकला व शिंका असल्यास
:: छातीत सतत दुखणे व दबाव असल्यासारखे वाटत असल्यास
:: ओठ व चेहरा नीळसर रंगाची छाप दाखवीत असल्यास
:: सतत तीव्र ताप असल्यास
:: मानसिक संभ्रम व उठण्यास त्रास होत असल्यास
:: श्वास घेण्यास त्रास होत असल्यास
- पल्सऑक्सिमीटरची अशी तपासणी करा
:: पल्सऑक्सिमीटर बोटाला लावून ६ मिनिटे खोलीतच चालावे.
:: ९४ टक्क्यांपेक्षा कमी किंवा ३ टक्के घटल्यास, बरे वाटत नसल्यास म्हणजे डोके हलके वाटणे किंवा दम लागत असल्यास तातडीने रुग्णालयात जावे.
:: ६० वर्षांपेक्षा ज्येष्ठांनी ३ मिनिटे चालून चाचणी करावी.