नागपूर : राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्याचा सूचना शासनाने केल्या आहेत. याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा (आयएमए) विरोध आहे. स्थानिक प्रशासनाने त्या-त्या शहरात ‘कॉमन एसटीपी’ उभारावी अशी मागणी आहे, असे प्रतिपादन ‘आयएमए’ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुटे यांनी येथे केले.
‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवार आयोजित करण्यात आला होता, त्यापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय ‘आयएमए’चे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, राज्य ‘आयएमए’चे पुढील वर्षीचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, नागपूर ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, सचिव कमलाकर पवार व ‘आयएमए’ नागपूरचा पुढील वर्षीच्या अध्यक्ष डॉ. मंजुश्री गिरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. ठाकरे म्हणाले, रुग्णालयातील निघणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. परंतु तेवढीच गरज घराघरातून निघणाºया सांडपाण्यावर सुद्धा आहे. कारण घरातही रुग्ण राहतात. त्यांचे मल-मूत्र, रक्त हे मोठ्या प्रमाणात सांडपाण्यात मिसळते. यामुळे स्थानिक प्रशासाने ‘कॉमन एसटीपी’ प्रकल्प उभारावा. ज्यामुळे रुग्णालयाचा खर्च व जागाही वाचेल. डॉ. आढाव म्हणाले, ही मागणी आम्ही लावून धरली आहे. यासाठी अधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.
५० लाखांच्या मदतीसाठी आता न्यायालयीन लढाई
डॉ. जयेश लेले म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होऊन जीव गमावणाºया डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे कोरोना कवच विमा संरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोनाचा काळात देशभरातील खासगी क्षेत्रातील २ हजार डॉक्टरांनी आपले जीव गमावले. परंतु अद्याप एकाही डॉक्टरांना ५० लाखांची मदत मिळाली नाही. यात ६५ वर्षांवरील व तरुण डॉक्टरांची संख्या मोठी आहे. यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत.
‘सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन अॅक्ट’ हवा
डॉक्टरांवरील मारहाणीचा घटना वाढत चालल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने डॉक्टरांना जीवे मारले जात आहे. केरळमधील घटना हे याचे ताजे उदाहरण आहे. या घटना रोखण्यासाठी ‘सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन अॅक्ट’ची ‘आयएमए’ची मागणी आहे, असे डॉ. लेले यांनी सांगितले.