नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) कोणत्याही पॅथीला विरोध नाही. मात्र ‘मिक्सोपॅथी’ला विरोध कायम आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अन्य पॅथीमध्ये प्राविण्य मिळविणाºया डॉक्टरांनी त्याच पॅथीमध्ये प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. परिणामी, ते रुग्णांना अधिक न्याय देऊ शकतात. त्यांनी अन्य शाखेच्या पॅथीत प्रॅक्टिस करण्यास आमचा विरोध आहे, असे स्पष्ट मत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा (आयएमए) मुख्यालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी व्यक्त केले.
‘आयएमए’ नागपूर शाखेचा रविवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, डॉ. दिनेश ठाकरे, आयएमएचे माजी राष्टीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी आयएमएच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. मंजुषा गिरी यांनी तर सचिवपदाची सूत्रे डॉ. प्राजक्ता कडूसकर यांनी हाती घेतली. विभागीय आयुक्त बिदरी यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयएमएने सिकलसेल, अॅनिमियाची जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक लसीकरणासारखे प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. संचालन डॉ. अंजली भांडारकर व डॉ. दिशा मेथवानी यांनी केले. आभार डॉ. प्राजक्ता कडूसकर यांनी मानले.
-डॉक्टरांवरील हल्ल्यावर जलद कृती गट डॉ. गिरी म्हणाल्या, या वषार्ची थीम ‘आॅल फॉर हेल्थ अँड हीलिंग हँड्’ आहे. हॉस्पिटल नोंदणीचे नूतनीकरण, जैव-वैद्यकीय कचºयाचे व्यवस्थापन आदी समस्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयएमए जलद गृती गट सक्रिय करणार आहे. यासोबतच किशोरवयीन आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेष योजना आखल्या जाणार आहेत. विविध संस्थांना ‘सीओएलएस’ व ‘सीपीआर’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘आओ गाव चले’ प्रकल्प नाविन्यपूर्ण मार्गाने राबविले जाणार आहे.
-अशी आहे नवीन कार्यकारणी अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, सचिव डॉ. प्राजक्ता कडूसकर, निर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, उपाध्यक्ष डॉ. समीर जहागिरदार व डॉ. सुषमा ठाकरे, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश गहुकर, सहसचिव डॉ. जितेंद्र साहू व डॉ. विरल शहा, आयएमए एएमएसच्या अध्यक्ष डॉ अंजली भांडारकर, सचिव डॉ. आदित्य परिहार, सहायक अभ्यास संचालक डॉ. नितीन गुप्ता व सचिव डॉ. रामविलास मालाणी आदींचा समावेश आहे.