नागपूर : कौटुंबिक वादामुळे वडिलाने तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या मुलाचा तात्पुरता ताबा आईकडे देण्यात येणार आहे. येते तीन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत हा मुलगा आईसोबत राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी यासंदर्भात निर्देश दिलेत. मुलगा शाहरुख सहा वर्षे वयाचा असून तो सध्या वडील इकबाल व सावत्र आई शमीमसोबत मुंबई येथे राहात आहे. त्याची सख्खी आई शबनम मेहकर (बुलडाणा) येथील रहिवासी आहे (नावे काल्पनिक). न्यायालयाच्या निर्देशानुसार, इकबाल व शमीमला शाहरुखसोबत उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता खामगाव येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर व्हायचे आहे. हे न्यायालय शबनमला शाहरुखचा ताबा देईल. शाहरुख सायंकाळी ५पर्यंत शबनमसोबत राहील. यानंतर शाहरुखला इकबाल व शमीम यांना परत करण्यात येईल. ही समान प्रक्रिया शनिवारपर्यंत राबविण्यात येईल. उच्च न्यायालयात या प्रकरणावर येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने शाहरुखला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी शाहरुखला न्यायालयात हजर केले. शाहरुखचा ताबा मिळण्यासाठी शबनमने रिट याचिका दाखल केली आहे. इकबाल मुंबईत बिल्डर आहेत. शबनम ही इकबाल यांची दुसरी पत्नी होय. पहिली पत्नी शमीम यांना अपत्य होत नसल्यामुळे इकबाल यांनी शबनम यांच्याशी दुसरे लग्न केले. शाहरुख जन्माला आल्यानंतर इकबाल व शमीम यांनी शबनमचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच, शाहरुखचा ताबा देण्यासाठी पाच लाख रुपयांचे आमिष दाखवले. यानंतर इकबालने शाहरुखचे अपहरण केले असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. तेजस्विनी खाडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
त्या आईकडे मुलाचा तात्पुरता ताबा
By admin | Published: July 28, 2016 2:46 AM