मेहा शर्मा
नागपूर : राज्याच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या सुधारित वृक्ष कायद्याची शहरात तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी ‘लोकमत’शी बोलताना केली. या कायद्यामुळे विकासाच्या नावावर वृक्षांची कत्तल करता येणार नाही. तसेच हेरिटेज वृक्षांचे संरक्षण केले जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
जयदीप दास यांनी सुधारित वृक्ष कायद्याचे स्वागत केले. शहरी वनासाठी या कायद्यात प्रभावी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वनसंपदा हळूहळू नष्ट होत आहे. त्यामुळे शहरात प्रस्तावित प्रकल्प बाहेर हलवले जाऊ शकतात. शहरातील वन संपदेचे संरक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन केली जाणार आहे. परंतु, नागपुरातील वर्तमान परिस्थिती या कायद्यापुढे आव्हान उभे करू शकते. त्यामुळे या कायद्याची कशी अंमलबजावणी होते हे येणाऱ्या काळातच कळेल असे त्यांनी सांगितले.
अनसूया काळे-छाबरानी म्हणाल्या, शहरात अनेक हेरिटेज वृक्ष असल्यामुळे हा कायदा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. वृक्ष संवर्धनासाठी राज्यस्तरीय समिती राहणार असून ती पक्षपातीपणे कार्य करणार नाही असा विश्वास आहे. मनपाने हेरिटेज वृक्षांची पारदर्शीपणे गणना करायला हवी. या प्रक्रियेत पर्यावरणप्रेमी नागरिक व संघटनांचा समावेश करायला पाहिजे. गेल्या ८ ते १० वर्षांत झालेली पर्यावरण हानी लक्षात घेता या कायद्याची गरज हाेती.
ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांनी हा कायदा क्रांतीकारी पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या कायद्यामुळे वृक्षांच्या कत्तलीवर वचक बसेल. मोठ्या संख्येत वृक्ष कापण्याचे प्रस्ताव रद्द होतील. वृक्ष कापल्यानंतर त्याऐवजी आवश्यक वृक्ष लावली जाताहेत की नाही यावर राज्यस्तरीय समितीचे लक्ष राहणार आहे. या कायद्यामुळे वर्तमान परिस्थितीत आमूलाग्र बदल होतील. सामान्य व्यक्तीला ५० वर्षांवरील वयाचे वृक्ष कापायचे असल्यास नवीन ५० वृक्ष लावावी लागतील. परंतु, एवढ्या मोठ्या संख्येत वृक्ष लावण्यासाठी जमीन शोधणे आव्हान ठरेल. या कायद्यामुळे अजनीतील इंटर मॉडेल स्टेशनसह इतर विकासकामांना विलंब होईल असेही त्यांनी सांगितले.
-------------------
सुधारित कायद्यातील तरतुदी
१ - हेरिटेज वृक्ष निर्धारित करणे
२ - महाराष्ट्र वृक्ष समितीची स्थापना
३ - २०० वर वृक्ष आणि हेरिटेज वृक्ष कापण्यासाठी राज्यस्तरीय समितीची परवानगी बंधनकारक
४ - वृक्षांचे वय निश्चित करणे
५ - कापलेल्या वृक्षाच्या वयाएवढे नवीन वृक्ष लावणे