नागपूर : दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतिक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे भाजण्याचा घटनांमध्ये वाढ होते. या दिवशी काही खासगी इस्पितळेही बंद राहतात. यामुळे रुग्णांची धाव मेडिकलकडे अधिक असते. याची दखल घेत मेडिकलने फटाक्यांनी भाजलेल्या रुग्णांसाठी तातडीचा उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे.
दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे भाजल्याच्या अनेक घटना घडतात. मागील वर्षी १००च्यावर रुग्ण उपचारासाठी आले होते. रुग्णांची ही संख्या पाहता यावर्षी मेडिकलने फटाक्यांनी भाजलेल्या रुग्णांसाठी आकस्मिक विभागात विशेष सोय उभी केली आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, फटाक्याने भाजलेल्या रुग्णांसाठी आकस्मिक विभागात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहे. त्यांना तातडीने उपचार मिळावा यासाठी मेडिसीन विभागाचे डॉक्टर, सर्जन्स, प्लास्टिक सर्जन व ‘सीएमओ’ यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक औषधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोय उभी करण्यात आली आहे.
-अशी घ्या काळजी
शक्यतो फटाक्यांना दूरच ठेवा. फटाक्यापासून सुरक्षीत अंतरावर उभे रहा. लहान मुलांनी पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे. मोकळ्या जागेत फटाके फोडा. शक्यतो सुतीकपडे घाला व पायात शूज वापरा. कानांमध्ये बोळे ठेवा, बोळ्यांमुळे ५० टक्के आवाजात घट होते. कुठलीही समस्या आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.