लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)तर्फे शहरातील विविध भागात घरकूल निर्मितीचे प्रकल्प राबविले जात आहेत. यात समावेश असलेल्या मौजा वाठोडा आणि मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बुधवारी प्रकल्पाची पाहणी करताना दिले.यावेळी अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार आणि कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी याठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा उगले यांनी घेतला. येथील कामांचे व फ्लॅटचे निरीक्षण त्यांनी केले. मौजा वाठोडा येथील घरकूल प्रकल्पाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. शिल्लक काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उगले यांनी कंत्राटदारांना दिले. यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद देवरस, सहायक अभियंता पंकज पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.मौजा तरोडी (खुर्द) प्रकल्पात राहणाऱ्या गाळे धारकांसाठी २५० मीटरचा जोड रस्ता तयार करा, प्रकल्पापासून शहराकडे येताना सिम्बॉयसिस विद्यापीठापासून २४ मीटर रुंद रस्ता तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, जेणेकरून गाळेधारकांना ४ किलोमीटर लांबीचे अंतर मोजावे लागणार नाही. यामुळे गाळेधारकांना प्रकल्पापासून ५ मिनिटात शहरातील रिंगरोडपर्यंत पोहोचता येईल. एमएमआरडीएने ऑनलाईन सोडत प्रक्रियेसाठी प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती केली आहे. प्रोबिटीकडून लाभार्थ्यांना तातडीने घरकुले वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.४०२८ घरांचे निर्माणप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या घरकुलांमध्ये रस्ते, सीवर लाईन, सुरक्षा भिंती, पार्किं ग आणि सोलर पॅनलची सुविधा गाळे धारकांसाठी करण्यात येत आहे. मौजा वाठोडा येथील खसरा क्रमांक ४३, ४४/२ मध्ये २६४ घरकुले, मौजा तरोडी (खुर्द) येथील खसरा क्रमांक ६३ मध्ये तब्बल २३७४ घरकुले व खसरा क्रमांक ६२ मध्ये ९४२ घरकुले निमार्णाधीन आहेत. याव्यतिरिक्त खसरा क्रमांक ५४, मौजा वाठोडा शेषनगर येथील गृहबांधणी प्रकल्पांतर्गत ४४८ घरकुलांच्या कामाचे आयुक्तांनी निरीक्षण केले.