लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेसबुक, ट्विटर व यूट्यूब यावरील न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी अतिशय खालच्या भाषेत पोस्टस् टाकल्या जात होत्या. त्या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब निदर्शनास येतपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी त्या पेजला भेट दिली होती. परिणामी, उच्च न्यायालयाने असे प्रकार थांबविण्यासाठी स्वत:च ही याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, केवळ फेसबुकच नाही तर, ट्विटर व यूट्यूब यावरही न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् टाकल्या जात असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे, याचिकेत या सर्वांना प्रतिवादी करण्यात आले. नोटीस बजावण्यात आल्यानंतर या कंपन्या न्यायालयात हजर झाल्या. दरम्यान, मंगळवारी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना हा आदेश देण्यात आला. या प्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून ते याचिकेचे कामकाज पहात आहेत.गुन्हेगारांवर कारवाई होईलसायबर गुन्हे विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यासह अन्य सोशल मीडियावर न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् टाकणाऱ्या गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. परिणामी, विभागाच्या पुढील हालचालीकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले आहे.
न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 8:25 PM
फेसबुक, ट्विटर व यूट्यूब यावरील न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : फेसबुक, ट्विटर , यूट्यूबला आदेश