लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे दहा किलोमीटर परिसरात पाळीव प्राणी, पक्षी आदीमुळे विमानांना अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या. पाळीव प्राण्यांना निर्बंध घाला तसेच परिसरातील स्वच्छता व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मिहानचे वरिष्ठ विमानतळ संचालक एम.ए.आबिद फरी, सह महाव्यवस्थापक एल.आर.भट, जीएमआर कंपनीचे मिलिंद पैडरकर, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सीआयएसएफचे एन.एस.रावत, विमानतळ व्यवस्थापक वासिम अहमद खान, स्वप्नील साने, अन्न व औषध प्रशासनाच्या वर्षा खरात, पर्यावरण विभागाच्या हेमा देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
बिदरी म्हणाल्या, पशु, प्राणी व पक्षी यांचे वास्तव्य या विमानतळ परिसराच्या दहा किलोमिटर राहणार नाही यासाठी वनविभाग, महापालिका, मिहान तसेच स्थानिक स्वराज्य समितीद्वारे पाहाणी करावी. नियमितपणे तपासणी करावी, या परिसरात पाळीव प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य होऊ नये याची खबरदारी घ्यावी. यासाठी या परिसरातील गावांमध्ये याबाबत जनजागृती मोहिम राबविण्याची सूचना केली.
विमानतळ परिसराच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे. परत काही भागात श्वानाचा वावर आढळून आला असून, पक्षी अथवा इतर कारणांमुळे विमानसेवा प्रभावित होणार नाही. यासाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले. विमानतळावर निर्माण होणारा दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी आवश्यक प्रणाली तयार करावी तसेच या कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी व यंत्रणा निर्माण करावी यासाठी महापालिकेचे सहकार्य घ्यावे असे विभागीय आयुक्त बिदरी यांनी सांगितले.
विमानतळावरील अवैध वाहतुकीविरुद्ध कारवाई कराविमानतळाच्या तसेच परिसरातील सुरक्षेसोबतच येथील अवैध वाहतुकी संदर्भात पोलीस विभागाने कारवाई करावी, तसेच त्रृटी संदर्भात संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजना करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी दिले.