कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी सांगोला (जि.सोलापूर) येथील आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शनिवारी विधानसभेत केली. 'हिंद केसरींचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले' या मथळ्याखाली लोकमतने १२ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध करुन याला वाचा फोडली होती. याची दखल घेत डॉ.देशमुख यांनी आज विधानसभेत याकडे लक्ष वेधले.आमदार डॉ. देशमुख म्हणाले, राज्यात सात हिंदकेसरी तर २० महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. या पैलवानांचे सहा हजारांहून १५ हजार रुपये मानधन करण्याची घोषणा सरकारने एक वर्षापूर्वी केली होती. मात्र, गेल्या एप्रिलपासून हे मानधन दिलेले नाही. त्यामुळे हे मानधन सरकारने त्वरित द्यावे. क्रीडाधिकारी कार्यालयात खेटे मारण्याची वेळहिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांची कुस्ती सुटली की उतारवयात त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक महिन्याला त्यांना सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे मानधन सहा सहा महिने मिळत नसल्याने या पैलवानांना क्रीडाधिकारी कार्यालयात खेटे मारण्याची वेळ येत आहे. मानधन रखडल्याने औषधोपचार व इतर आवश्यक गोष्टींसाठी या पैलवानांची परवड होत असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते.
हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सात-आठ महिन्यांपासून मानधन रखडल्याने उतारवयात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत लोकमतने सातत्याने आवाज उठविला आहे. आज विधानसभेत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनीही आमची मागणी लावून धरली त्याबद्दल त्यांचे आभार. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरी पैलवान.