आकांक्षा कनाेजिया
नागपूर : महानगरपालिकेने गणेश उत्सव सुरू हाेण्यापूर्वी पीओपी मूर्तींच्या विक्रीवर कारवाई केली हाेती. मात्र कठाेर प्रतिबंधानंतरही शहरात पीओपी मूर्तींची विक्री झाली. नागरिकांना मातीची व पीओपी मूर्तीमधील फरक सहज लक्षात येत नसल्याने विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेतला. गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी झालेल्या विसर्जनात १०.६८ टक्के मूर्ती पीओपीच्या असल्याचे लक्षात आल्याने या मूर्तींची विक्री झाल्याचे स्पष्ट हाेते.
मनपाने दीड दिवस व पाच दिवसाच्या गणेश विसर्जनाचे आकडे नुकतेच जाहीर केले. यादरम्यान शहरात ५,१२० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८९.३२ टक्के मातीच्या मूर्ती हाेत्या, तर १०.६८ टक्के पीओपी मूर्ती असल्याचे आढळून आले. विसर्जनापूर्वी तलावाच्या आसपास शेड लावून विसर्जनासाठी टँक लावण्यात आले हाेते. पीओपी मूर्ती वेगळ्या काढून ठेवल्या आहेत, जेणेकरून तलाव प्रदूषित हाेणार नाही. मात्र कारवाई आणि कठाेर प्रतिबंधानंतरही पीओपीच्या मूर्ती आल्या कशा, हा प्रश्न आहे.