लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरासह येरखेडा, रनाळा गणेशमूर्तींचे विसर्जन श्रीक्षेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे केले जात हाेते. परंतु, काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने श्रीक्षेत्र महादेव घाट येथे कामठी कॅन्टाेन्मेंट बाेर्ड प्रशासनाने मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. यामुळे नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून कामठी नगरपालिकेच्या वतीने शहरात १२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांनी केले आहे.
कामठी, येरखेडा, रनाळा परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे गणेशमूर्ती विसर्जित करीत हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता कामठी कॅन्टाेन्मेंट बाेर्ड प्रशासनाने महादेव घाटावर मूर्ती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने शहरातील गंज बालाजी मंदिर पाेलीस लाईन, हुतात्मा स्मारक जयस्तंभ चाैक, लाेहिया लाॅन लाला ओळी, पंकज मंगल कार्यालय रनाळा, संघ मैदान राममंदिर मच्छी पूल, दिवाण मंदिर जुनी ओळी, कामठी नगर परिषद कार्यालय पोलीस स्टेशनसमोर, देवी मंच मंदिर मोंढा, हनुमान मंदिर छावणी परिषद, नगरपालिका कार्यालय जुनी इमारत, निंबाजी आखाडा बजरंग पार्क कामठी, श्री साईबाबा मंदिराजवळ या १२ ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी याच तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करून पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष माे. शहाजहान शफाअत अन्सारी, मुख्याधिकारी संदीप बाेरकर व आराेग्य निरीक्षक विजय मेथिया यांनी केले आहे.