नागपूर : महापालिकेने चार फुटाहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलार नदी, कन्हान नदी, कोराडी तलाव यासह प्रामुख्याने दहा ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या वेळी कुठली अनुचित घटना घडू नये, यासाठी १८९ जलतरण पटु तैनात करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात ६३४ गणेश मंडळांनी श्री गणेशांची प्रतिस्थापना केली आहे. यात चार फुटांहून अधिक उंचीच्या ४११ तर २२३ मूर्ती चार फुटापेक्षा कमी उंचीच्या आहेत. ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळी अनुचित घटना घडू नये यासाठी जलतरण पटु तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अधिका-यांनी दिली.
मनपाच्या अग्निशमन विभागातील जवानांना पोहण्याचे प्रशिक्षण असते. मात्र या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने ६० कर्मचा-याहून अधिक कर्मचारी या विभागाकडून उपलब्ध होण्याची शक्यता नाही. किमान दहा विसर्जन स्थळी जलतरण पटुंची गरज भासणार आहे. कोलार नदी, कन्हान नदी, मौदा नदी, कोराडी यासह आवश्यक ठिकाणी बचाव पथक तैनात ठेवावे लागणार आहे. एका शिप्टमध्ये ६३ प्रशिक्षित कर्मचारी लागतील. याचा विचार करता १८९ कर्मचा-यांची गरज भासणार आहे. यासाठी विविध विभागांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
३७० कृत्रिम टँक
शहरात दोन लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. याचा विचार शहराच्या विविध भागातील तलाव परिसर, चौक, मैदाने यासह अन्य ठिकाणी गणेश विसर्जनासाठी ३७० कृ त्रिम टँकची वयवस्था केली जाणार आहे. या कृत्रिम टँकमधये चारफुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येईल. विसर्जनाच्या वेळी भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी यंदा टँकची संख्या २५ टक्के वाढविण्यात आली आहे.