गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : पावसाळा सुरू होताच जंगलातील रानभाज्या आणि तणभाज्या उगवायला लागल्या आहेत. लवकरच त्या बाजारात विक्रीसाठी येतीलही. त्यांची ओळख असणारे हौसेने खरेदी करतील. मात्र, ज्यांना याचे ज्ञानच नाही, ते फक्त कुतूहल म्हणून बघत पुढे जातील. रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या या रानभाज्या आणि तणभाज्या माणसांना देण्यासाठी निसर्ग सरसावला असला, तरी ‘निसर्ग आहे द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशीच काहीशी अवस्था सध्या दिसत आहे.
रानभाज्या या पूर्णत: नैसर्गिक आणि रसायनमुक्त असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर खनिजे, जीवनसत्वे असतात. अनेक रोगांवर त्या गुणकारी असतात. पहिल्या पावसासोबत त्या ठराविक काळात उगवतात. श्रावण महिन्यापर्यंत वाढतात. पुढे हळूहळू उगवायच्या थांबतात.
सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकजण शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मागे लागला आहे. महागडी औषधे, काढे, रसायनांचा वापर यासाठी होत असताना अनेकांना या रानभाज्यांची ओळख नाही. आदिवासींना रानभाज्यांचे पूर्वापार ज्ञान आहे. त्यांच्या एका पिढीकडून नंतरच्या पिढीकडे हे ज्ञान हस्तांतरित होत असले तरी नागरी भागात त्याचा फारसा प्रचार नाही. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया जिल्ह्यांत २५ रानभाज्या खाद्यान्नामध्ये वापरल्या जातात. ऋतुमानानुसार त्या सहज उपलब्ध होतात.
...
- भारतात जंगली आणि पहाडी भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या जाती : ४२७
- महाराष्ट्रातील जंगली आणि पहाडी भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या जाती : ४७
- जगभरात वनस्पतींच्या प्रजाती : ३२ लाख ८३ हजार
- भारतीय आदिवासी, ग्रामीण व शहरी भागात आहारातील भाज्या : १,५३० पेक्षा अधिक
- राज्यात रानभाज्यांमध्ये कंद : १४५
- हिरव्या भाज्या : ५२१
- फूलभाज्या : १०१
- फळभाज्या : ६४७
- बियाणे व सुकामेवा प्रजाती : ११८
...
पूर्व विदर्भातील रानभाज्या
उतरण, काटवल (कर्टूले), माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, तरोटा, केना, धानभाजी, टेकाडे, पकानवेल, भशेल पानवेल, बांबू वास्ते, भराटी, मटारू, रानमटारू, सुरण, रानकोचई, वाघोटी, दिंडा, वडवांगे, माठ, आघाडा, घोळ, चिवळ, धोपा, शेरेडीरे, खापरखुटी (पुनर्नवा), आदी.
...
भाज्या आणि गुणधर्म
खापरखुटी (पुनर्नवा) - आयुर्वेदात पुनर्नवा असे नाव. शरीराला नवचैतन्य देते.
कुडा : आयुर्वेदात कुटज असे नाव. कुटजावलेह, कुटज धनवटी. आयुर्वेदिक औषधात कुड्याच्या मुळावरील सालीचा वापर. पोटदुखी, हगवण यावर उपयोगी. याच्या बियांना इंद्रजव म्हणतात. कामशक्ती वाढविण्यासाठीच्या औषधात वापर.
बहाव्याचे फूल - पोटविकारावर गुणकारी.
हरदफरी - उष्ण, पाचकशक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी.
हरदोलीचे कांदे (कंद) - रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.
अंबाडी - क, अ जीवनसत्वयुक्त, रोग प्रतिकारशक्ती वाढविते. लोह, झिंक, कॅल्शियम असते.
घोळ - थंड गुणाची, पाचक व रूचकर, उन्हाळ्यात खाणे अधिक लाभदायक.
कुरडू - तणभाजी असून, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. दमा, श्वसनरोगात लाभदायक. श्रावणात सर्वांनी खावी.
आघाडा - तणभाजी असून, कडू व पाचक असते. उष्णता कमी करून लघवीतील आम्लता दूर करते.
चुक्का - उष्णतेचे विकार घालवून पचनक्रिया सुधारते. सूज उतरविते, रक्तदोष दूर करते.
केना - त्वचाविकार घालविते, सुज उतरविते, पचनक्रिया सुधारून पोट साफ करते.
कोंबडा (कुकूर्डा) - किडनी स्टोनसाठी औषध म्हणून वापर.
...