लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांतर्फे संचालित एसबीआय एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत सेवानिवृत्तीनंतर अडकलेली डॉ. प्रदीप येळणे यांच्या ठेवीची रक्कम परत करण्याचे आदेश सहकारी संस्था, नागपूरचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला दिले आहेत. यासंदर्भात ११ ऑगस्टला सोसायटीला पत्र पाठविले आहे.बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या १० कोटींच्या ठेवी सोसायटीत फसल्या असून, अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी परत न केल्याच्या संदर्भातील बातमी लोकमतने ‘एसबीआय एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत अडकले १० कोटी’ या मथळ्याखाली प्रकाशित केली होती, शिवाय डॉ. येळणे यांनीही जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला उपरोक्त आदेश दिले आहेत. तक्रार/निवेदनाची दखल घेऊन नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि कार्यालयाला अवगत करावे, अन्यथा अध्यक्ष व व्यवस्थापकाविरुद्ध पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी पत्रात नमूद केले आहे.प्राप्त माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोसायटीचे सदस्य असून, ते दर महिन्याला ठराविक भागाची व ठेवीची रक्कम जमा करतात. सदस्य बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सोसायटीत जमा केलेली रक्कम त्यांना परत मिळते आणि त्यांचे सभासदत्व कमी करण्यात येते. पण तब्बल एक वर्षानंतरही डॉ. प्रदीप येळणे यांची ठेवीची रक्कम सोसायटीने परत केली नाही आणि सभासदत्वही कमी केले नाही. यासंदर्भात त्यांनी जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कडू यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत.
प्रभाव लोकमतचा : ठेवीची रक्कम परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 1:05 AM