लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने मागे घेतले आहे. २२ मे रोजी संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले होते व त्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी याचा विरोधदेखील केला होता.मंगळवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी नवीन परिपत्रक जारी केले. ‘कोरोना’मुळे लावण्यात आलेला ‘लॉकडाऊन’ लक्षात घेता २२ मे रोजी जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. नवीन परिपत्रक नंतर जारी होईल, असे त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे.परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य होणार नाही, अशी भूमिका काही विद्यार्थी संघटनांनी घेतली होती. विलंब शुल्कासह त्यांना किती रक्कम जमा करावी लागेल हे विद्यापीठाने स्पष्ट न केल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले होते. प्रत्यक्षात विद्यापीठाकडे विलंब शुल्क जमा करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यातील एका नियमानुसार विलंब शुल्काच्या रूपाने फक्त ५० ते १०० रुपये आकारणी केली जाते तर अन्य नियमानुसार विद्यार्थ्यांकडून ५ हजार ते २० हजार रुपये विलंब शुल्क घेण्याचेदेखील प्रावधान आहे. यामुळे विद्यापीठ वर्तुळातून टीका होत होती. अखेर विद्यापीठाने हे परिपत्रकच मागे घेतले आहे.
प्रभाव ‘लोकमत’चा : विद्यापीठाने परत घेतले विलंब शुल्काचे परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:13 AM