पाच मार्गांवरील बसेस पर्यायी मार्गाने : खड्ड्यांमुळे प्रवासीही त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अर्धटवट सिमेंट रोड व पावसामुळे डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे आपली बसचे काही मार्ग बदलविण्यात आले आहेत. गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अर्धवट सिमेंट रोड व पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे पाच मार्गांवरील बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात कामठी, हिंगणा, पारडी, सीताबर्डी ते यशोधरा नगर, सीताबर्डी ते नागसेनवन आदी मार्गांचा समावेश आहे. तसेच शहराच्या विविध भागातील २० मार्गावरील बसचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती आहे. बसचे मार्ग बदलण्यात आल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे याची पूर्व सूचना नसल्याने थांब्यावर प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे असतात.
खड्ड्यांमुळे बसच्या फेरीलाही अधिक वेळ लागत असल्याने डिझेलवरील खर्च वाढला आहे. बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने दुरुस्ती खर्चात ३० टक्के वाढ झाल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ब्रेक नादुरुस्त होणे, टायर व शॉकअप नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे आपली बस ताफ्यातील २३४ बसेस २० जून २०२१ पर्यंत सीएनजीमध्ये परिवर्तित करावयाच्या होत्या. परंतु, २९ ऑगस्टपर्यंत फक्त ७० बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात महापालिकेला यश आले आहे.
..
६५ टक्के बसेस रस्त्यावर
मनपाच्या ४३८ पैकी २९९ बसेस सुरू आहेत. म्हणजेच जवळपास सध्या ६५ टक्के बसेस शहरात धावत आहेत. कोरोना संक्रमण कमी झाल्याने व्यवहार सुरू झाले आहेत. सणवारांचे दिवस असल्याने बाजारातही गर्दी वाढली आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
...
मनपाच्या बसेस
स्टॅंडर्ड - २३७
मिडी - १५०
मिनी -४५
इलेक्ट्रिक -६