नितीन गडकरी : लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात ध्वनी, जल आणि वायूप्रदूषण या तिन्ही क्षेत्रांत काम करणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांत शहर प्रदूषणमुक्त होईल, असा कार्यक्रम तयार करून तो महापालिकेने नगरसेवकांच्या सहकार्याने राबवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मनपाच्या वतीने नागपूर शहरातील १२ उद्यानांमध्ये जपानच्या तंत्रज्ञानावर आधारित लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात येत आहे. रविवारी शंकरनगर उद्यानात आयोजित कार्यक्रमात यापैकी तीन प्रकल्पांचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले, निशांत गांधी, रूपा राय, उज्ज्वला शर्मा, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या बाबतीत नागपूर क्रमांक एकचे शहर व्हावे यासाठी दरवर्षी पाच लाख झाडे लावण्यात यावीत. सांडपाणी शुद्ध करून वीज केंद्राला दिले जाते. त्यातून २५ ते ३० कोटी मनपाला मिळतात, वेस्ट टू वेल्थ असा हा कार्यक्रम आहे. नागपूरच्या नाग नदीतून वॉटर ट्रान्सपोर्ट व्हावे, या दृष्टिकोनातून कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी २४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुढील १५ दिवसांत यासाठी सल्लागाराची नियुक्ती होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाण्याचे ९० टक्के प्रदूषण मनपा हद्दीतील सांडपाण्यामुळे होते, तर १० टक्के उद्योगातील पाण्यामुळे होते. पंतप्रधानांनी नमामी गंगे कार्यक्रम सुरू केला. ज्याचे प्रमुख गडकरी यांना केले. या कार्यक्रमामुळे यंदा पहिल्यांदाच कुंभमेळ्यानंतर गंगा स्वच्छ दिसली.
दयाशंकर तिवारी यांनी लघु सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामागील भूमिका सांगितली. संचालन जलप्रदाय समितीचे माजी सभापती विजय झलके यांनी केले. आभार सभापती सुनील हिरणवार यांनी मानले.
...
बांधकामासाठी लाल टँकरने पाणीपुरवठा
लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पातून बांधकामांना लाल टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी ४ हजार लिटरचे विशेष लाल रंगाचे टँकर राहतील. त्यावर पुनर्वापरासाठी पाणी (रिसायकल वाॅटर) असे लिहिलेले असेल. एका टँकरकरिता ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर लाल टँकरला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.