लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आक्रमकपणे कामी लागले आहेत. ऑपरेशन क्राईम कंट्रोलसाठी तयार करण्यात आलेल्या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मार्च अखेरपर्यंत शहरातील गुन्हेगारांच्या सर्वच मोठ्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगार, अवैध धंदेवाले तसेच पडद्यामागे राहून गुन्हेगारांची पाठराखण करणारांना आम्ही त्यांची जागा दाखवू, असा आत्मविश्वास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केला. शनिवारी दुपारी पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चा करताना शहरातील ‘क्राईम ॲण्ड पुलिसिंग’बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
गेल्या काही महिन्यात उपराजधानीत हत्येच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राणघातक हल्ले (बाॅडी अफेन्स)सुद्धा वाढले आहेत. एकूणच गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा क्राईम रेकॉर्ड अन् कारणे लक्षात घेऊन शहरातील गुन्हेगारांचा सफाया करण्यासाठी पोलिसांनी विशेष ॲक्शन प्लॅन बनविला आहे. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलपासून ते अतिरिक्त पोलीस आयुक्तांपर्यंत प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गेल्या २० वर्षांतील ६ हजार गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला किंवा ते कारागृहात बंद असून अशांची संख्या १५०० आहे. तर उर्वरित ४५०० गुन्हेगारांची रोज झाडाझडती घेतली जात आहे. गेल्या दोन महिन्यात ४६५ गुन्हेगारांवर ११० नुसार तर ६० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, ७५० जण शहरातून बेपत्ता (त्यांच्या मूळ पत्त्यावर राहत नाहीत) आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. २५० जणांना कारागृहात डांबण्यात आले आहे. १७ गुंडांवर एमपीडीए लावून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. उर्वरित जे बाहेर आहेत त्यांच्यापैकी भूमाफिया राकेश डेकाटे, कुख्यात गुंड दिवाकर कोतुलवार आणि त्याचा भाऊ आशू यांच्यावर गेल्या आठवड्यात कारवाई करण्यात आली असून, आंबेकर टोळीवर आज पुन्हा एक मकोका लावण्यात आला आहे. ५७ गुन्हेगार पॅरोलवर बाहेर आले आहेत. ते आणि नागरिकांना वेठीस धरू पाहणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारांवर आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर पोलिसाची नजर आहे. त्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर त्याच्या भागातील तीन ते चार गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या कोणत्या गुन्हेगारावर कोणती कारवाई करायची, त्यासंबंधीचे अधिकार त्या त्या विभागाच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले आहेत. रोज सायंकाळी जागोजागी नाकाबंदी लावण्यात येत आहे. ड्रग माफिया, नशेखोर, जुगार अड्डा तसेच अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या नेटवर्कवरही आमची नजर असून शहरातील काही ‘स्पॉट’वर लवकरच कोम्बिंग ऑपरेशन आणि छापेमार कारवाई तुम्हाला बघायला मिळेल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
---
व्हिजिलिंग पुलिसिंगवर भर
४८० चार्ली तयार ।
जागोजागी पोलिस दिसावेत आणि कुठे काही गुन्हा अथवा घटना घडल्यास त्या ठिकाणी पीडिताच्या मदतीसाठी २ ते ५ मिनिटात २० ते २५ पोलीस पोहचावेत, अशीही योजना आहे. त्यासाठी १२५ मोटरसायकली आणि ४८० चार्ली तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी कमांडोजसारखा विशेष युनिफॉर्मसुद्धा बनविण्यात आला आहे. लवकरच त्यांना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
----
सीधी बात, नो बकवास
ज्याची वृत्तीच गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा समाजकंटकाला सुधारण्याच्या कितीही संधी दिल्या तरी त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे त्याच्यापासून समाज सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे आपले मत आहे. त्यामुळे कोणताही मोठा किंवा सराईत गुन्हेगार मोकाट राहू नये, असे आपल्याला वाटते. फरारीच्या नावाखाली कुणी दडून बसतात अन् तेथून ते गुन्हेगारी कारवाया करतात, अशांची थेट माहिती द्या, त्याला त्याची जागा दाखविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
विशेष म्हणजे, अनेक सराईत गुन्हेगारांना गेल्या १५ दिवसांत आयुक्तालयात बोलावून स्वत: अमितेशकुमार यांनी त्यांचा क्लास घेतला आहे. यातील एका कुख्यात गुन्हेगाराने अनेकांसमोर कान पकडून उठाबशा काढल्या आहेत, हे विशेष.
----
बिनेकर हत्याकांडात फाशीची मागणी
व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बाल्या बिनेकर हत्याकांड देशभर चर्चेला आले आहे. त्याची चार्जशीट तयार झाली असून, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली जाणार आहे. आपल्या नजरेत हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ (रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट) आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची सुनावणी करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.
----