डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 09:57 PM2022-02-25T21:57:47+5:302022-02-25T21:58:31+5:30
Nagpur News डिजिटल नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले.
नागपूर : अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता व पदाधकाऱ्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांची डिजिटल नोंदणी करावी. या नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले. देवडिया काँग्रेस भवन येथे शुक्रवारी पल्लम राजू यांनी डिजिटल नोंदणी अभियानाचा नागपूर शहर व ग्रामीणचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पल्लम राजू म्हणाले, देशात जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून लोकांपर्यंत पोहोचण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्लॉक व वॉर्ड स्तरापर्यंत नोंदणीवर अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. या मोहिमेचा आपण दर आठ दिवसांनी प्रमुखांकडून आढावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. विकास ठाकरे यांनी नागपूर शहर डिजिटल सदस्य नोंदणीत महाराष्टात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत ३१ मार्चपूर्वी राज्यात पहिल्या क्रमाकांवर राहील, असा विश्वास व्यक्त केला.