लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे. त्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय देण्याचा आदेश यवतमाळ कुटुंब न्यायालयाला देण्यात आला आहे.गोपाल धाबर्डे यांची विभक्त पत्नी ललिता यांनी कर्करोगावरील उपचारासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी व पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत मिळण्याकरिता कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका प्रलंबित असताना २१ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अधिकृत वारसदार म्हणून ही याचिका पुढे चालविण्याची परवानगी मिळण्यासाठी ललिता यांची बहीण माया पाटील यांनी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुटुंब न्यायालयाने १७ सप्टेंबर २०१६ रोजी तो अर्ज मंजूर केला. त्याविरुद्ध धाबर्डे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कायद्यानुसार पती हा पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्याविषयीच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होतो, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीनंतर वरील मुद्दा निर्णयासाठी निश्चित केला. तसेच, पक्षकारांनी कुटुंब न्यायालयात हजर होऊन २९ फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणे सादर करावे आणि कुटुंब न्यायालयाने या मुद्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय जारी करावा, असे आदेश दिले. याचिकेवर न्या. रवींद्र घुगे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.