लेन्सचा कृत्रिम तुटवडा! : एफडीएकडून वितरकाची चौकशीनागपूर : महागडे कृत्रिम नेत्रभिंग (इंट्रॉक्युलर लेन्स) विकत घेऊनही बिल दिले जात नसल्याचे लेन्सच्या काळाबाजाराचे वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच अनेक वितरकांचे धाबे दणाणले. सूत्रानुसार, काही वितरक भूमिगत झाले. परिणामी, लेन्सला घेऊन अनेक औषध दुकानांनी हातवर केले होते, तर जे वितरक थेट डॉक्टर्सना लेन्स पोहचवित होते त्यांनीही ऐनवेळी नकार दिला. यामुळे शनिवारी लेन्सचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला. काही शस्त्रक्रिया सामोर ढकलल्याचे समजते. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या प्रकरणाला गंभीरतेने घेऊन मेडिकल चौकातील एका औषध दुकानाची व लेन्स वितरकाची कसून चौकशी केली.शहरात रोज २५०वर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. यातील २००वर शस्त्रक्रियांसाठी लागणारे लेन्स हे खासगीमधून विकत घेतल्या जातात. शहरात ‘सुपर सॉफ्ट’, ‘मिडीयम सॉफ्ट’ व ‘नॉर्मल सॉफ्ट’ गुणवत्तेच्या लेन्सची विक्री होते. यातही ‘इंडियन’ व ‘इम्पोर्टेड लेन्स’ विक्रीस उपलब्ध आहेत. ‘इम्पोर्टेड लेन्स’ महागडे आहे. याला घेऊनच घोळ सुरू आहे. शुक्रवारी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या डोळ्यात ‘फ्रिडम आयकॉन’ कंपनीचा १४०६ए०२५ बॅच नंबरचे ‘इंट्रॉक्युलर लेन्स’ बसविण्यात आला. परंतु त्याला मेडिकल चौकातील एका औषध दुकानदाराने बिल मिळणार नाही या शर्तीवरच लेन्स दिला. हाच प्रकार इतरही औषध दुकानातून होत असल्याचे सामोर आले. लोकमतने या संदर्भातील वृत्त ‘लेन्सचा काळाबाजार’ या मथळ्याखाली शनिवारी प्रकाशित केले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. ‘एफडीए’चे एक पथक शनिवारी सकाळीसच मेडिकल चौकातील एका औषध दुकानात पोहचले. सूत्रानुसार, औषध दुकानदाराच्या कागदपत्राची तपासणी केली. सोबतच ‘फ्रिडम आयकॉन’ कंपनीचे वितरक ‘अमिया सेल्स एजन्सी’चीही चौकशी करण्यात आली. जे वितरक नियमबाह्य जाऊन थेट डॉक्टरांना लेन्सचा पुरवठा करीत होते. त्यांनी आज लेन्स देणे टाळले. अनेक औषध दुकानातूनही लेन्स उपलब्ध न झाल्याने शनिवारी लेन्सच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
डोळ्यांच्या शस्त्रक्रिया प्रभावित
By admin | Published: September 18, 2016 2:28 AM