लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या बहुजन रंगभूमीची निर्मिती आणि नाट्यकर्मी वीरेंद्र गणवीर यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या हिंदी नाटक ‘भारतीय रंगमंच के आद्यनाटककार भदंत अश्वघोष’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. हिंदी भाषिक गटात या नाटकाने अभिनयाच्या प्रथम पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत. गोव्याला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.इ.स. पूर्व पहिल्या शतकातील भदंत अश्वघोष यांची भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार म्हणून ओळख आहे. युनानी नाटकांनी प्रभावित झालेल्या अश्वघोष यांनी भारतात याप्रकारे नाटकांची निर्मिती केली. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अश्वघोष यांनी बौद्ध धम्म ग्रहण करून धम्मप्रसारासाठी नाट्यकलेचा उपयोग केला. त्यांच्या जीवनावर आधारीत ‘अश्वघोष’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याची किमया बहुजन रंगभूमीच्या माध्यमातून वीरेंद्र गणवीर यांनी केली आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शनासह त्यांनी यात अभिनयही केला आहे. हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत त्यांनी याचे लेखन केले आहे. नाटकात त्यांच्यासह श्रेयस अतकर यांनी अश्वघोष यांची भूमिका साकारली. सोबत अस्मिता पाटील (प्रभा- अश्वघोषांची प्रेयसी) व जुहील उके याने भदंत धर्मसेन यांची भूमिका साकारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी हिंदी भाषेतून प्रवेश घेतला होता. राज्य स्पर्धेंतर्गत १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे या नाटकाचा प्रयोग झाला. अश्वघोषावर सादर झालेली देशातील ही पहिलीच कलाकृती असून त्यास राज्य नाट्य स्पर्धेने सन्मानित केले आहे.नाटकात अश्वघोषाची भूमिका करणाऱ्या श्रेयस अतकर यास अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. याशिवाय दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी रंगभूषा व वेशभुषेचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. नाटकाची प्रकाश व्यवस्था सांभाळणारे किशोर बत्तासे यांनाही पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यभरातून सादर झालेल्या ५२ नाटकांपैकी अश्वघोषला निर्मितीचा चौथा पुरस्कार आणि रौप्य पदक प्राप्त झाल्याची माहिती वीरेंद्र गणवीर यांनी दिली. हे पुरस्कार जाहीर झाल्याने बहुजन रंगभूमीच्या माध्यमातून उपराजधानीच्या नाट्यसृष्टीचा गौरव वाढविला आहे.