लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन हटताच जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने जीएसटीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध छापेमार कारवाई सुरू केली आहे. या युनिटने कोणत्याही मालाची विक्री न करता बोगस रसीदद्वारे व्यवहार आणि अनुचित पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविल्याच्या माहितीच्या आधारे नागपूर शहरातील एका आयर्न स्टील उद्योजक आणि त्याच्या पुरवठादारांच्या फर्मवर छापे टाकले.
कारवाईदरम्यान ११.०९ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा घेतल्याचा आणि ५५ कोटी रुपयांचा बोगस व्यवहार केल्याचा खुलासा झाला आहे. या आधारावर फर्ममधून मोबाईल आणि कॉम्प्युटर डाटासह अन्य संदिग्ध कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात युनिटने एका व्यक्तीला अटक करून आतापर्यंत १.८१ कोटी रुपयांची जीएसटी वसुली केली आहे.
बोगस रसीद बनवून जीएसटीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध डीजीजीआय, नागपूर झोनल युनिट विशेष अभियान राबवीत आहे. अनलॉक होताच युनिटचे अधिकारी जीएसटीचा बोगस व्यवहार करणाऱ्यांचा शोध घेत आहे. अधिकाऱ्यांच्या चमूने आयर्न स्टील उद्योजकाच्या कारखाना परिसरात आणि काही पुरवठादारांवर गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकले. उद्योजक विविध प्रतिष्ठानांकडून बेहिशेबी कबाड खरेदी करीत होते. हा व्यवहार लपविण्यासाठी ते बोगस रसीदचा मार्ग अवलंबून अनुचित पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट घेत होते.
वाहतुकीशी जुळलेली कागदपत्रे जसे ट्रक रसीद, जीआर नोट, पेमेंट स्लीप, वाहन पोर्टलवरून वाहनांची माहिती आदी एकत्रित करून हा खुलासा झाला आहे. यापैकी बहुतांश वाहन वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या जड वाहनांऐवजी प्रवासी कार होत्या. त्यानंतर लोडिंग/अनलोडिंग चार्ज, ट्रान्सपोर्टरला झालेल्या भुगतानची कागदपत्रे आदी तपासल्यानंतर केवळ कागदावरच व्यवहार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना कळाली. अधिकाऱ्यांना सत्य कागदपत्रे सापडल्यानंतर बोगस बिलाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उद्योजकाने मान्य केले. सोबतच त्याने आतापर्यंत स्वत:हूनच १.८१ कोटी रुपयांचा जीएसटी चुकता केला आहे. बोगस रसीद जारी करणारे मुख्य पुरवठादार फर्मच्या संचालकाला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अनेक उद्योजक व पुरवठादार यात गुंतले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.