लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज वाहतूक शाखेची कानउघाडणी केली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारली नाही तर ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी ते कर्मचाऱ्यांर कारवाई करण्याचा इशारा दिला. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या परेडवरून वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता शहरातील वाहतूक व्यवस्था सुधाारण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. त्यांना वाहतूक शाखेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अवैध वाहतूक व संगनमत तसेच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी याची चांगली कल्पना आहे. मागील काही दिवसात वाहतूक शााखेबद्दल तक्रारींचे प्रकार वाढले आहे. एक महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यातून हटवून वााहतूक शाखेत पाठविण्यात आलेल्या निरीक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दाही चांगला गाजला हाेता. ज्या अधिकाऱ्यांना वाहतूक शाखेत पाठविण्यात आले होते, त्यांना पुन्हा ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. वाहतूक नियमाचे सक्तीने पालन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माेहिमेचा परिणाम चांगला राहिला. यानंतरही अधिकाऱ्यांच्या दबावामुळे वसुली होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. मंगळवारी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, वसुली किंवा गडबड कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. कुणीही यात दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. चालानच्या नावावर नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नका, जी व्यक्ती वााहतूक नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करा. अवैध वाहतूक, रस्त्यावर वाहन पार्क करणे, फॅन्सी नंबर प्लेट, साायलेन्सरमध्ये बदल, निष्काळजीपणे वाहन चालविणारे यांच्याविरुद्ध कारवाई करा. वारंवार नियम तोडणाऱ्यांची वाहने जप्त करा, त्यांचा परवाना रद्द करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बॉक्स
हवालदार चालवतोय यंत्रणा
सूत्रानुसार वाहतूक शााखेत कार्यरत एका हवालदारामुळे पूर्ण विभाग बदनाम होतो. हा हवालदार चार वर्षांपासून तैनात आहे. त्याने एसीबीमध्येही काम केले आहे. हा कर्मचारीच पूर्ण यंत्रणा संचालित करीत आहे. अनेक कामे त्याच्या माध्यमातूनच होत आहेत.