वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सात दिवसांत आपल्या कामात सुधारणा करावी; अन्यथा बदली केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिला. आयुक्तांच्या या इशाऱ्यामुळे वाहतूक विभागात खळबळ उडाली आहे.
बुधवारी मासिक गुन्हे बैठकीत वाढते रस्ते अपघात आणि नियोजनाचा अभाव यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक विभागाला चांगलेच धारेवर धरले. त्यांचे म्हणणे होते की, रस्ते अपघात वाढणे चिंताजनक आहे. नवीन नवीन ठिकाणीही अपघात होत आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळांची पाहणी करून अपघातांचे कारण व ते रोखण्यासाठी उपाययोजना करावी. भविष्यात कुठलाही अपघात झाल्यास चेंबरच्या पीआयने त्यांना तात्काळ सविस्तर माहिती द्यावी. दरम्यान, एका पीआयने अपघातांसाठी वाहन चालकांना दोषी ठरविले असता ‘ज्ञान पाजळू नका’ असे म्हणत त्याला निरुत्तर केले. वाहतूक विभागातील काही अधिकारी-कर्मचारी अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या वाळूमाफियांची वाहने पास करण्यासह इतर दुसऱ्या अवैध कार्यात सहभागी आहेत. अशा अधिकाऱ्यांनी सात दिवसांत आपल्या कामात सुधारणा करावी. जिल्ह्यात वाळूमाफिया सक्रिय असल्याचेही ते म्हणाले.
उत्तर नागपुरातील अनेक भागांत जड वाहने पार्क केली जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही दिले. मारहाण व हल्ल्याच्या घटनांवरही त्यांनी चिंता व्यक्त करीत संबंधित ठाणेदारांना योग्य पाऊल उचलण्याचे निर्देश दिले. मंगळवारी काळी मारबतजवळ गर्दी झाल्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या प्रकारची चूक भविष्यात होऊ नये, अशी ताकीद दिली.
बॉक्स
मिरवणूक काढता येणार नाही
गणेशोत्सवादरम्यान असलेल्या निर्बंधांचे पालन काटोकोरपणे व्हावे, तसे न झाल्यास संबंधित ठाणेदारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जनप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. याचे कठोरपणे पाालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.