राजेश टिकले
नागपूर : एका दारू पिणाऱ्या व्यक्तीमागे किमान १० लोकं दु:खी असतात. दारूड्यांमुळे दु:खी असणाऱ्यांच्या व्यथा, वेदना, हालअपेष्टा आणि परवड रिता कोंगरे यांनी प्रत्यक्ष बघितली. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार, मुलाबाळांची होरपळ, आई-वडिलांची घालमेल बघितल्यावर रिता व्यथित झाल्या आणि त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी दारुड्यांना सुधारण्याचा वसा घेतला. आज १७ वर्षे झालीत हजारो दारुड्यांवर त्यांनी उपचार केले आहेत. यातील अनेक कुटुंबांमध्ये त्यांनी शांती, आनंद, समाधान पेरले आहे.
एकच प्याला कुठल्यातरी आनंद किंवा दु:खाच्या कारणाने अनेकांनी ओठाशी लावला. आता हा एकच प्याला घेण्यासाठी अनेकांना निमित्ताचीही गरज भासत नाही. समाजात व्यसनाच्या आहारी गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यसन एक आजार असून, कुठल्याच औषधाने ते सोडणे शक्य नसल्याचा दावा केला जातो. नागपुरातील रिता कोंगरे या व्यसनमुक्तीचे काम करीत आहेत. व्यसन सोडविणे अवघड असले तरी अशक्य नाही, या विश्वासानेच त्यांनी व्यसनमुक्तीचे काम हाती घेतले आहे. हुडकेश्वर रोडवर मुक्ताई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र त्या चालवितात. व्यसनाच्या आधीन गेलेल्यांना व्यसनातून बाहेर काढण्याचे अवघड काम रिता करतात.
रिता यांची आई मेयो रुग्णालयात परिचारिका होती. त्यांनी अनेकांची सेवा केली. आईचा सेवाभाव काहीसा त्यांच्यातही रुजला आणि व्यसनाधिनांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी घेतला. एम.कॉम. झाल्यानंतर त्यांनी एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. मेडिकल आणि सायक्रॅटिक या विषयात स्पेशीलायझेशन करून २००६ मध्ये एका व्यसनमुक्ती केंद्रातून कामाला सुरुवात केली. २०१२ मध्ये त्यांनी स्वत:चे व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू केले.
- व्यसन हे आजार आहे, ते सुटू शकते
सुरुवातीला आनंदासाठी दारू पिणाऱ्यांना व्यसन कधी जडते कळतच नाही. व्यसनामुळे त्याची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक हानी मोठ्या प्रमाणात होते. ती व्यक्ती व्यसनांच्या गर्तेत गेल्यानंतर कुटुंबीयांच्या वेदना असाहाय्य होतात. त्यांचे कुटुंबीय आमच्या केंद्रात आणून सोडतात. व्यसन हा आजार आहे, तो सुटू शकतो, त्यासाठी कधी कठोर तर कधी प्रेमाने साद घालावा लागतो. त्यांची इच्छाशक्ती वाढवावी लागते. त्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांची समुपदेशनाने त्यांची मानसिकता बदलावी लागते. ३ ते ६ महिन्यांचा हा कालावधी असतो, या कालावधीतून त्यांच्यावर केलेल्या विविध प्रयोगातून त्यांचा स्वभाव, विचार आम्ही बदलवितो. व्यायाम, मेडिटेशन आणि प्रबोधन हेच आमचे शस्त्र आहे. या माध्यमातून अनेकजण बरे झाले असल्याचे रिता कोंगरे म्हणाल्या.
- आता व्यसनांच्या विळख्यात महिलाही
आधुनिकता, स्वैराचार, स्वच्छंदी जगण्याची मानसिकता आता महिलांमध्ये वाढली आहे आणि यातूनच अनेक तरुणी व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. व्यसनमुक्तीचे काम करीत असताना रिता यांना आता व्यसनात अडकलेल्या तरुणींचे पालकही संपर्क करायला लागले आहेत. महिलांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यासाठीही व्यसनमुक्ती केंद्र नागपुरात सुरू करण्याचा रिता यांचा मानस आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा नॉर्मल सामाजिक जीवन जगता यावे, समाजात व्यसनाधीन व्यक्ती असूच नये या उद्देशातून त्या काम करीत आहेत.