नागपूर : एका गाडीमुळे तिच्या मागच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, हे माहित असूनही काही समाजकंटक विनाकारण किंवा आपल्या स्वार्थासाठी पाहिजे त्या ठिकाणी चेन पुलिंग करून(साखळी ओढून) ट्रेन थांबवितात. गेल्या एप्रिल महिन्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर चक्क १३५ वेळा चेनपुलिंग करण्यात आल्याचा गैरप्रकार घडला आहे.
कोणत्याही रेल्वे मार्गावर एक ट्रेन विनाकारण थांबली किंवा थांबवली गेली तर तिच्या मागे धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विनाकारण कुणी चेन ओढून ट्रेन थांबवली तर त्याला एक हजार रुपये दंड किंवा एक वर्ष कारावास किंवा या दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतुद रेल्वे कायद्यात आहे. मात्र, त्याला न जुमानता अनेक समाजकंटक विनाकारण चेन पुलिंग करून ट्रेन थांबवितात.
दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे एप्रिल २०२४ या एक महिन्याच्या कालावधीत तब्बल १३५ वेळा चेन पुलिंग झाल्याचे प्रकार घडले. गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग रसमडा रेल्वे मार्गावर, डोंगरगड, राजनांदगाव आऊटर, गोंदिया आउटरवर हे गैरप्रकार घडले आहे. त्याची दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी गोंदिया स्थानकावर अॅन्टी चेन पुलिंग (एसीपी) स्कॉड तयार केला आहे. ज्यात चेकिंग स्टाफ आणि आरपीएफचाही समावेश असून संयुक्तपणे ते कारवाई करणार आहे. कुण्या प्रवाशाने अत्यावश्यक कारणाशिवाय चेन पुलिंग केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.