तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Published: December 1, 2023 03:07 PM2023-12-01T15:07:41+5:302023-12-01T15:08:18+5:30
एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागपूर : तेंगणात काँग्रेसला गळली लागली होती. काँग्रेसचे बहुतांश आमदार व नेते पक्ष सोडून गेले. मात्र, पक्षाचा राज्य प्रभारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर गेले ११ महिने काँग्रेस एकसंघ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेते काँग्रेसप्रति विश्वास निर्माण झाला. फक्त पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.
एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, ११ महिन्यांपूर्वी ४ जानेवारी रोजी आपल्याला तेलंगणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली होती. अ.भा. काँग्रेस कमिटीने मदतीला रोहीत चौधरी, विश्नुनाथ व मंसुर अली खान हे तीन सचिव दिले होते. तेलंगणा काँग्रेमध्ये प्रचंड अंतर्गत वाद होते.
सर्वप्रथम स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले. सर्वांशी समन्वय साधला. कुणाशीही भेदभाव केला नाही. पहिल्या तीन महिन्यात अंतर्गत वाद संपवले व एकत्र होऊन काम करायला सुरवात केली. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पाठबळ दिले. प्रदेशाध्यक्ष रेवंत रे़डी यांनी चांगले काम केले. काँग्रेस एकसंघ आहे असे चित्र जनतोसमोर गेले. त्यामुळे लोकांचाही विश्वास बसला की काँग्रेस लढण्यासाठी ताकदीने पुढे आली आहे.
‘भारत जोडो’मुळे वातावरण निर्मिती
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली. या यात्रेनंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या. शेवटच्या टप्प्यात भाजपसह बऱ्याच पक्षातील लोक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचेही गेलेले बरेच परत आले.
केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी
- भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय पसरणे सुरू केले होते. मात्र, काँग्रेसने सर्वप्रथम सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी झाली. शेवटी केसीआर यांना चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील दौरे बंद करावे लागले. भाजप व टीआरएस मध्ये फाईट होईल, असेच सर्व म्हणत होते. पण आज काँग्रेस स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.