नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठामधील प्रभारी कुलगुरु नियुक्तीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. न्यायालयाने मंगळवारी या वादाची दखल घेऊन विद्यापीठ कुलाध्यक्ष, कुलसचिव व प्रभारी कुलगुरु डॉ. भीमराय मेत्री यांना नोटीस बजावली आणि या वादावर येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष आहेत.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरुंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा कार्यभार प्र-कुलगुरुंकडे सोपविणे आवश्यक आहे. मागील कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी राजीनामा दिला. त्यावेळी विद्यापीठात प्र-कुलगुरुचे पद रिक्त होते. या परिस्थितीत विद्यापीठातील सर्वात वरिष्ठ प्राध्यापकाकडे कुलगुरु पदाचा कार्यभार सोपविणे बंधनकारक होते. त्यानुसार प्रा. डॉ. लेल्ला कारुण्यकारा यांना प्रभारी कुलगुरु करण्यात आले होते. त्यानंतर लेल्ला यांना नवीन कुलगुरु नियुक्त होतपर्यंत या पदावर कायम ठेवायला पाहिजे होते. असे असताना विद्यापीठ कुलाध्यक्षांनी डॉ. लेल्ला यांच्याकडील कुलगुरु पदाचा प्रभार काढून तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांना दिला. यासंदर्भात १९ ऑक्टोबर २०२३ रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
कायद्यामध्ये विद्यापीठाबाहेरील व्यक्तीकडे कुलगुरु पदाचा प्रभार सोपविण्याची तरतूद नाही. त्यामुळे डॉ. लेल्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डॉ. लेल्ला यांच्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.