नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी स्मार्च टेलिफोन व ई-किओस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.
ई किओस्कच्या माध्यमातून कैद्यांना शिक्षा प्रकरण व न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत माहिती घेता येईल. कारागृहातील सर्कल परिसरात हे किओस्क उभारण्यात आले आहे. या प्रणालीमुळे कैद्यांना त्यांची न्यायालयातील सुनावणीची तारीख, अभिवचन रजा, संचित रजा, उपहारगृह इत्यादींची सखोल माहिती मिळेल. बायोमॅट्रीक प्रणालीतून अंगठ्याच्या माध्यमातून कैदी याचा वापर करू शकतील. तर ॲलन फोन सुविधेमुळे आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटांसाठी नातेवाईक, वकिल किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलता येणार आहे. महिन्यातून कैद्यांना १२ वेळा फोन करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात एक वेळा व्हिडीओ कॉलची सुविधादेखील राहणार आहे. या सुविधांमुळे गैरप्रकाराने बाहेर संपर्क करण्याच्या गोष्टींवर आळा येईल, असा विश्वास अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला. या फोन सुविधेचा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. यावेळी कारागृह अधीक्षक वैभव आगे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे, श्रीधर काळे, सतिश कांबळे, तुरुंगाधिकारी यशवंत बनकर, विजय सोळंके, राजेंद्र ठाकरे, दयावंत काळबांडे, प्रमोद चामट, मनीष शेंडे, सागर सुवासार, अनमोल हुमणे, पवन आत्राम, धर्मपाल शेंदरे हेदेखील उपस्थित होते.