योगेश पांडे, नागपूर : लोकसभा निवडणूकीत भाजपच्या राज्यातील जागा घटल्या असल्या तरी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी या यात्रेच्या माध्यमातून जनतेत पोहोचतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही माहिती दिली आहे.
नागपुरात ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे नेते असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.