नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बालरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाºया दोन वर्षांच्या आतील बालकांची संख्या मोठी आहे. परंतु येथे स्तनपानाची स्वतंत्र सोय नव्हती. यामुळे मातांची गैरसोय व्हायची. याची दखल घेवून मेडिकलने ‘हिरकणी कक्ष’ सुरू केले.
२०२२च्या नागपुरातील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. सरोज अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी यासाठी विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला होता. याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर नागपूर मेडिकलमध्ये हा कक्ष सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे, मेडिकलच्या बालरोग विभागातील ‘ओपीडी’मध्ये रोज २५०वर रुग्ण येतात. यातील जवळपास ६० टक्के बालकेही दोन वर्षांखालील असतात. या बालकांना स्तनपान करण्यासाठी आतापर्यंत स्वतंत्र दालन नव्हते. यामुळे बालकांना पदराखाली घेताना मातांची गैरसोय व्हायची. याची दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली. त्यांच्या सूचनेवरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांच्या पुढाकाराने हा ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आला. याचे उद्घाटन डॉ. गजभिये यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. गावंडे, डॉ. तिवारी यांच्यासह माजी विभाग प्रमुख, डॉ.सायरा मर्चंट,आशिष लोठे आदी उपस्थित होते. हा कक्ष झुल्फिकार कमाल आणि आॅर्कस लाइफ सायन्सेस यांनी उपलब्ध करून दिला.