नागपूर : यावर्षीच्या शेवटी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात लढली जाणार असून २५ टक्के जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विजयवर्गीय म्हणाले, आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशात निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे काहीच फरक पडणार नाही. मध्य प्रदेशात तिसऱ्या पक्षाचा प्रयोग कधीच यशस्वी झाला नाही. मद्य धोरणाबाबत माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत विचारणा केली असता त्यांची नाराजी दूर झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानची निवडणूक सामूहिक नेतृत्वात लढली जाईल, तर पश्चिम बंगालमध्येही भाजपला बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला.
उत्तर-पूर्वच्या तीनही राज्यांत सरकार
- त्रिपुरा व नगालँडमध्ये भाजपचे सरकार बनत आहे. मेघालयातही भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल. कारण उत्तर-पूर्वतील प्रादेशिक पक्ष हे नेमही केंद्र सरकारसोबत राहणे पसंत करतात. स्थानिक पक्षांशी युती न झाल्यामुळे त्रिपुरामध्ये भाजपला काही जागा कमी मिळाल्या, अशी कबुली त्यांनी दिली.