दयानंद पाईकराव,नागपूर : ढाब्यावर मागील तीन वर्षांपासून वेटरचे काम करीत असलेल्या आणि मुक असलेल्या ५० वर्षाच्या वेटरला भरधाव टिप्परने धडक दिल्यामुळे त्याला जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पारडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली असून पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकास अटक केली आहे.
रामु (५०) असे मृत्यू झालेल्या वेटरचे नाव आहे. तर गणेश उर्फ बादल महादेव उके (२४, रा. गोवरी ता. मौदा, जि. नागपूर) असे आरोपी टिप्पर चालकाचे नाव आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोशन हरिभाऊ गजभिये (४०, रा. वॉर्ड क्र. २, कापसी बुजुर्ग) हे उमीया वसाहतकडे जाणाऱ्या रोडवर पारडी येथे रोशन ढाबा चालवितात. त्यांच्या ढाब्यावर रामु हा मागील तिन वर्षांपासून काम करून तेथेच राहत होता. तो मुका असल्यामुळे त्याचा मुळ पत्ता कोणालाच माहित नव्हता. सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजता रामु रस्त्याच्या पलिकडे असलेल्या कामाचा ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट समोरून आपण काम करीत असलेल्या ढाब्याकडे परत येत होता.
दरम्यान, भंडाराकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम. एच. ४०, बी. एल-९६८८ चा चालक गणेशने आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रामुला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषिक केले. या प्रकरणी रोशन गजभिये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक गणेश उके यास अटक करून तपास सुरु केला आहे.