नागपूर : जिल्ह्यात २९,३५२ हेक्टरवर फलोत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१,९७३ हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात जिरायती क्षेत्र किमान ८० टक्के आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के क्षेत्रात बहुवार्षिक तसेच फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबी, केळी, कागदी लिंबू, आंबा, डाळींबाचेही उत्पादन शेतकरी घेतात. मात्र, सर्वाधिक कल हा संत्रा व त्यापाठोपाठ मोसंबीकडे आहे. त्यामध्येही काटोल, नरखेड, कळमेश्वर व सावनेर या चार तालुक्यांत प्रामुख्याने संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संरक्षित सिंचनासाठी विहीर, त्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी सुविधा, फळबाग लागवडीसाठी कलमा, याशिवाय जुन्या संत्रा बागांच्या पुनरूज्जीवनासाठी शासन अनुदान देते.
सर्वाधिक क्षेत्र संत्र्याचे
जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र संत्र्याचे आहे. वातावरण संत्र्यासाठी पोषक असल्याने दोन बहर, विविध योजनांचा लाभ यामुळे संत्रा व मोसंबीचे क्षेत्र वाढत आहे.
विदेशातही निर्यात
संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये केली जाते. अलीकडे तेथील सरकारने संत्र्यावरील आयात कर वाढविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे.
केंद्राने बांगलादेशातील शुल्क कमी करावे
विदर्भात उत्पादित होणारा ‘ए’ ग्रेडचा संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेश भारतीय संत्र्यावर आयात शुल्क प्रति किलो ६२ रुपये आकारत होता. आता ते प्रति किलाे ८५ रुपये केले आहे. त्यामुळे वैदर्भीय संत्रा बांगलादेशात महाग झाला आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारसोबत बोलून भारतीय संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, अशी संत्रा उत्पादकांची मागणी आहे.
- मान्सून लांबल्याचा परिणाम संत्राच्या मृग बहरावर झाला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आंबिया बहर चांगला आला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमीच आहे. त्यामुळे भाव चांगला मिळेल. विदर्भातील संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र, बांगलादेशने भारतीय संत्र्यावर आयात शुल्कात प्रति किलो तब्बल २३ रुपयांनी वाढ केली आहे. यात केंद्राने हस्तक्षेप करून शुल्क कमी करण्याची गरज आहे.
- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज