- आनंद डेकाटे
नागपूर : विभागात सर्वत्र पाऊस पडत असून खरिप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्यात आहेत. विभागातील मुख्य पिकाखाली क्षेत्रापैकी १९ लाख १४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख २३ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सरासरी ७४.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यात भात रोवणीला सुरुवात झाली असून विभागात ४३ टक्के पेक्षा जास्त भार रोवणी आटोपली आहे. या जिल्ह्यामध्ये भात रोवणीला गती आली आहे.
खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. (९८.३१ टक्के), नागपूर जिल्ह्यात सरासरी ४ लाख ६५ हजार ३२७ च्या तुलनेत ३ लाख ८६ हजार ३११ हेक्टर (८३.०२), भंडारा जिल्ह्यात सरासरी १ लाख ८६ हजार १५३ च्या तुलनेत १ लाख ५ हजार २४९ (५६.५४ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ७१५ च्या तुलनेत १ लाख ६ हजार १२१ (५६.५३ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ६७० च्या तुलनेत ३ लाख ३८ हजार ९९७ (७३.०९ टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २ लाख ४ हजार ९६२ च्या तुलनेत ८१ हजार ७०७ हेक्टर (३९.८६ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
विभागात कापूस तसेच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून १००.६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात १०२.३३ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १०५.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ९६.१६ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८४.६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ९६.४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन पिकाखाली असलेल्या सरासरी क्षेत्रापैकी ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक भंडारा जिल्ह्यात १४९.५६ टक्के, वर्धा जिल्ह्यात १०६.९४ टक्के, नागपूर जिल्ह्यात ९०.१२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७९.७९ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ८६.४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरिप हंगामामध्ये तूर, मुग, उडिद, तृणधान्य, कडधान्य, यासोबतच भुईमुग, तीळ इतर गळित धान्य यासह ऊसाची नवीन लागवड झाली आहे. ऊसाच्या एकुण क्षेत्रापैकी २६ टक्के लागवड नवीन क्षेत्रात झाली आहे.