कमल शर्मा
नागपूर : पेट्रोलच्या किमतीचे मायाजाळ नागरिकांना समजण्यापलीकडे आहे. किमतीत अजूनही खिसे कापत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येत नाही. केंद्र सरकारच्या करकपातीनुसार नागपुरात पेट्रोल ११०.४३ रुपये लिटर मिळायला हवे होते, पण ते १११.०९ रुपयांत मिळत आहे. अर्थात ग्राहकाला प्रति लिटर ६६ पैशांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
लोकमतने दर संदर्भात चौकशी केली असता अचंबित करणारा खुलासा समोर आला आहे. केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवर अबकारी शुल्कात कपात करून देशातील नागरिकांना दिलासा दिला. दुसरीकडे राज्य सरकारने रविवारी पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये व्हॅट कमी केल्याचा दावा केला. या वृत्त दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर न करता गुपचूप किंमत वाढविली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विभिन्न करकपातीनंतर नागपुरात पेट्रोलची किंमत ११०.४३ रुपये लिटर असायला हवी. पण पंपांवर १११.०९ रुपयांत पेट्रोल विकण्यात येत आहे. तसे पाहता पेट्रोल पंपांना देण्यात येणाऱ्या इनव्हाईसमध्ये पेट्रोलची बेसिक प्राईस आताही ५७.३३ रुपयेच आहे. त्यावर आकारण्यात येणाऱ्या करानंतर येणारे मूल्य हे वास्तविक मूल्यापेक्षा ६६ पैशांनी कमीच आहे. पेट्रोलची किंमत पेट्रोलियम कंपन्यांच्या मुख्यालयात निश्चित होत असल्याचे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. प्रत्येक पंपावर वेगवेगळे दर असतात. याची माहिती वित्त विभागाकडून घ्यावी लागेल.
अशी असते पेट्रोलची करासह किंमत
बेसिक प्राईस ५७.३३ रु.
अबकारी शुल्क १९.९० रु.
२५ टक्के व्हॅट (राज्य) १९.३० रु.
उपकर १०.१२ रु.
डीलर कमिशन ३.७८ रु.
एकूण ११०.४३ रु.
नागपुरात किंमत १११.०९ रु.
रोखीने खरेदी
पेट्रोल आणि डिझेलची किंमत कंपन्या ठरवितात. आता तर कंपन्या रोख मिळाल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल देत नाहीत. रोखीच्या कमतरतेमुळे खरेदी न झाल्यास पंप अनेकदा बंद राहतात.
अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन.