नागपूर : ३० हजार रुपयांच्या उधारीतून मध्यरात्री घरात शिरून राडा घालणाऱ्या आरोपींनी धक्का मारल्यामुळे मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेचा मृत्यू झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शांताबाई प्रेमचंद कुकडे (७२, सप्तगिरी ले आऊट, भिलगाव) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या त्यांचा मुलगा प्रकाश (४६) व सुनेसोबत राहत होत्या. प्रकाशचा मिठाई बनविण्याचा कारखाना आहे. प्रकाश यांनी परिचित राजेश केमलाल ईमले (३०, सुदामनगर, यादवनगर) याच्याकडून ३० हजार रुपये उधार घेतले होते. सोमवारी रात्री ११ वाजता कुकडे कुटुंबीय झोपले असता ईमले हा संजय ईमले, कमल ईमले व मावस भाऊ मिलींद डेरे तसेच सचिन गदरेसोबत तेथे पोहोचले. ते दारूच्या नशेत होते. उधार घेतलेल्या पैशांची मागणी करत त्यांनी कुकडे यांच्या पत्नीला शिवीगाळ सुरू केली.
आवाज ऐकून प्रकाश बाहेर आले व रात्रीची वेळ आहे, शिवीगाळ करू नका. उद्या सकाळी आपण बोलू असे म्हटले. यावर संतापलेल्या आरोपींनी प्रकाश यांची कॉलर पकडत मारहाण सुरू केली. हे पाहून प्रकाश यांची आई शांताबाई या बाहेर आल्या. त्यांनी सुनेसोबत प्रकाश यांना सोडविण्यासाठी मध्यस्थी सुरू केली. हे पाहून सचिनने त्यांना धक्का दिला. त्यामुळे शांताबाई अडखळून खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला मुका मार लागला. त्या बेशुद्ध झाल्या व ते पाहून आरोपी तेथून निघून गेले. प्रकाश यांनी शांताबाई यांना मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रकाश यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजेश ईमले याला अटक केली आहे.