योगेश पांडे - नागपूर
नागपूर : उपराजधानीतील चोरट्यांचा सुळसुळाट कायमच असून आता त्यांनी थेट महानगरपालिकेच्या सामानावरच डोळा टाकला आहे. मनपाच्या वीज विभागाचे गोदाम फोडून त्यातून तब्बल ७.६५ लाखांचा माल लंपास करण्यात आला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कॉटन मार्केट येथे मनपाच्या वीज विभागाचे गोदाम असून तेथे लाखोंचे पथदिव्यांच्या फिटिंगचे व वीजेचे इतर साहित्य ठेवले होते. ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला व त्यातून फिटिंगचे तसेच वीज साहित्याचा ७.६५ लाखांचा माल उडविला. आश्चर्याची बाब म्हणजे भर बाजारात असलेल्या या गोदामातून माल गायब झाल्याची इतके दिवस कुणाला माहितीदेखील झाली नाही. गोदाम उघडल्यावर माल कमी दिसल्यावर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. मनपाच्या वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनिल शामराव नवघरे यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.