अभय लांजेवार
नागपूर : राज्यात पहिल्यांदाच ‘न्यूड डान्स’चा गंभीर प्रकार व्हायरल क्लिपच्या माध्यमातून उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप नेमक्या कोणत्या परिसरातील असाव्यात, यावर अनेकांनी तर्कवितर्क लावले. काहींनी हात वर केले. या परिसरातील हा प्रकार नव्हेच! अशी कॅसेट अनेकांनी दोन दिवसांपासून वाजवली. दुसरीकडे पोलिसांसमोर या अतिशय गंभीर प्रकरणाच्या तपासाचे आव्हान होते. संपूर्ण पोलीस यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा यांनी दोन दिवस रात्रंदिन एक करत या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली. आता संपूर्ण कारवाई आणि आरोपींच्या अटकेनंतर ‘डान्स हंगामा’चे सादरीकरण करणारे नागपूरचे होते आणि व्हायरल झालेल्या क्लिप उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथीलच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे.
१७ जानेवारी रोजी दुपारी शंकरपटाचे आयोजन पार पडल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सुरू झालेल्या ‘डान्स हंगामा’ या कार्यक्रमात पाचशेवर तरुणांची उपस्थिती होती. शिवाय सुरूवातीला काही तास ‘डान्स हंगामा’तील सादरीकरण मर्यादेत होते. रात्री ११ वाजल्यानंतर रंगमंचावर बंद शामियानात ‘आशिक बनाया’ या गाण्यांसह अन्य हिंदी गाण्यांवर अंगप्रदर्शन सुरू झाले. रंगमंचावरच विचित्र हावभाव, अर्धनग्न अवस्थेत अश्लिलतेचे प्रदर्शन सुमारे अर्धा तास चालले. अंगावरील कपडे काढण्याचा आणि फेकण्याचा कार्यक्रमसुद्धा चांगलाच चालल्याची बाब बाह्मणी येथील व्हायरल व्हिडीओ क्लिपवरून लक्षात येते.
नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी पूजा गायकवाड यांच्याशी याप्रकरणी बातचीत केली असता, व्हायरल क्लिप आणि हा ‘न्यूड डान्स’ बाह्मणी येथील डान्स हंगामा कार्यक्रमातीलच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी (दि. २२) ‘लोकमत’च्या मुख्य अंकात ‘दिवसा शंकरपट; रात्री शामियानात न्यूड डान्स’ या शीर्षकाखाली वृत्त झळकले. सर्वप्रथम ‘लोकमत’ने ही बाब उजेडात आणल्यानंतर खासगी वाहिन्यांवर तसेच सोशल मीडियावर बातम्यांना उधाण आले. पोलिसांच्याही तपासाला चांगलाच वेग आला.
याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये अजून आरोपींची संख्या वाढणार आहे. रंगमंचावरून अश्लिलतेचे प्रदर्शन करणाऱ्या डान्स हंगामा कार्यक्रमाचे पडसाद राज्यभरात उमटत असून, यावर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मुंबईत काही वर्षांपूर्वी डान्स बारच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत नाचगाणे रंगायचे. सन २००५ साली दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संपूर्ण राजकीय वजन पणाला लावत डान्स बारबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बाह्मणी येथे घडलेल्या अश्लाघ्य प्रकाराने गृह विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लगतच्या काही राज्यांमध्येसुद्धा विविध कार्यक्रमांमध्ये ‘छमछम’चे सादरीकरण बघावयास मिळते. असे असले तरी बाह्मणी येथील प्रकाराने मात्र विभत्सतेची पातळी ओलांडली आहे, अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.
पोलीस आंधळे कसे?
गावखेड्यातील शांतता व सुव्यवस्थेची मौलिक जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. बाह्मणी गावातसुद्धा पोलीस पाटील कर्तव्यावर आहे. शिवाय बाह्मणी बीटची जबाबदारी एक बीट जमादार आणि दोन पोलीस कर्मचारी सांभाळतात.
बाह्मणी येथून उमरेड पोलीस ठाणे केवळ १० किमी अंतरावर आहे. असे असताना डान्स हंगामाचा हा ‘नग्न’ तमाशा पोलीस यंत्रणेपर्यंत का पोहोचला नाही. पोलीस पाटील, बीट जमादार, कर्मचारी नेमके कुठे कर्तव्य बजावत होते. आयोजकांना पडद्यामागे मदत करणारे हात कुणाचे, असा सवाल विचारला जात असून, पोलीस इतके आंधळे कसे, असा संतापसुद्धा व्यक्त होत आहे.
डान्स हंगामाचा मुख्य सूत्रधार एलेक्स उर्फ प्रबुद्ध बागडे याच्या अटकेसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळाली असून, आरोपीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याही अटकेची प्रक्रिया आज पूर्ण होईल.
- पूजा गायकवाड, तपास अधिकारी