लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुंबलेले गटार, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा, अतिक्रमण, उद्यानात सुविधांचा अभाव, मोकाट जनावरे अशा नागरी समस्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे मागील दोन वर्षांत ५८ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. दररोज सरासरी ८० तक्रारी येतात. प्रशासनाकडून याची वेळीच दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
नागरी समस्यासंदर्भात मनपाच्या पोर्टलवर तक्रार करण्याची सुविधा आहे. झोन कार्यालयात तक्रार निवारण केंद्र गठित करण्यात आले आहे. कचऱ्यासंदर्भातील तक्रार स्वच्छता ॲपवर नोंदविता येते. दोन वर्षात दहा झोनमध्ये ५८ हजार ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. यात सर्वाधिक मंगळवारी झोनमधील ९९३८, तर सर्वात कमी १९०३ तक्रारी सतरंजीपुरा झोनमधील आहेत. लक्ष्मीनगर झोनमधील ९०१२, नेहरूनगर ६२२७, आशीनगर ५२४६, धंतोली ४७०६, धरमपेठ ७७४६, गांधीबाग ३२३३, हनुमाननगर ६८७४, तर लकडगंज झोनधील ३१८१ तक्रारींचा समावेश आहे. प्रशासनाने ५६,८६९ तक्रारी निकाली काढल्याचा दावा केला आहे. परंतु प्रशासनाकडून तक्रारींची वेळीच दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नगरसेवकांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. काही वजनदार नगरसेवकांच्या प्रभागातील तक्रारी मार्गी लागत होत्या. मात्र ४ मार्चपासून त्यांचा कार्यकाळ संपला. प्रशासकीय राजवटीत तक्रारी वाढल्या आहेत.
सिवरेजसंदर्भात सर्वाधिक तक्रारी
शहरातील अनेक भागातील सिवरेज लाईन ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या आहेत. लोकसंख्या वाढीसोबतच त्यावरील भार वाढला आहे. गटर लाईन जीर्ण झालेल्या असल्याने तुंबण्याचे प्रकार वाढले आहे. मागील दोन वर्षांत सीवरेजसंदर्भात १९,०६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर कचऱ्यासंदर्भात १३,०२६ तक्रारी प्राप्त झाल्या.
झोननिहाय तक्रारी
लक्ष्मीनगर -९०१२
धरमपेठ -७७४६
धंतोली -४७०६
हनुमाननगर -६८७४
नेहरूनगर -६२२७
गांधीबाग-३२३३
सतरंजीपुरा-१९०३
लकडगंज -३१८१
आशीनगर-५२४६
मंगळवारी-९९३८
अशा आहेत तक्रारी
सीवरेज -१९०६९
कचरा-१३०२६
रस्ते व अन्य ६८०१
पथदिवे-५०५६
अतिक्रमण-४०१४
मोकाट जनावरे, कुत्रे-३५५९